येडगावच्या हॉटेलमधून ७५ हजारांची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 12:15 AM2018-12-29T00:15:12+5:302018-12-29T00:15:32+5:30
येडगाव येथील आयव्ही फॅमिली रेस्टॉरंट आणि वाईन बारचा दरवाजा तोडून ७५ हजारांची रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली
नारायणगाव : येडगाव येथील आयव्ही फॅमिली रेस्टॉरंट आणि वाईन बारचा दरवाजा तोडून ७५ हजारांची रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली असून हा चोर दुसरा-तिसरा कोणी नसून वेटरनेच ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. वेटरकडून चोरीला गेलेल्या रकमेपैकी ६० हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील यांनी दिली.
येडगाव हद्दीत १३ डिसेंबर २०१८ रोजी ही मध्यरात्री १२ नंतर ते सकाळी ७ वाजण्याच्यादरम्यान बारचा मुख्य काचेचा दरवाजा उघडून त्यातील रोख रक्कम ७६ हजार ८६४ रुपये चोरून नेले होते, याबाबत आयव्ही फॅमिली रेस्टॉरंट आणि वाईन बारचे मॅनेजर जितेंद्र अशोक गाढवे (वय ३५, रा. आर्वी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी अज्ञात चोरट्याच्याविरोधात त्यावेळी फिर्याद दिली होती.
याबाबत घोडे-पाटील यांनी तपास सुरू केला, गुन्हा घडलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही चेक केले असता ते बंद होते, म्हणून तेथील कामगाराकडे व गोपनीय बातमीदारांकडे अधिक तपास केला असता बारचा वेटर नितीन अशोक दांगट (वय २८, रा. नारायणगाव) याने ही चोरी केल्याचे
निष्पन्न झाले.
दांगट यास अटक करून त्याच्या तपासात गुन्ह्यातील चोरीस गेलेली रोख रकमेपैकी ६० हजार रोख हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती घोडे-पाटील यांनी दिली.
ही कारवाई जुन्नरच्या पोलीस उपअधीक्षक दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शननाखाली सहायक पोलीस निरीक्षक घोडे-पाटील, पोलीस नाईक लोंढे, पोलीस नाईक शिंदे, पोलीस शिपाई कोबल, वाघमारे, लोहार यांनी केली. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक लोंढे करीत आहेत.