खोट्या कागदपत्रांद्वारे ७७ वर्षीय वृद्धेची जमीन बळकावणाऱ्या बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 06:48 PM2021-08-01T18:48:25+5:302021-08-01T18:49:45+5:30
Case filed against father son : भाईंदरच्या राई गावात राहणाऱ्या जयश्री प्रभाकर म्हात्रे ह्या ७७ वर्षीय वृद्धेच्या फिर्यादीवरून भाईंदर पोलीस ठाण्यात मोरवा गावातील शागिर्द डेकोरेटर चे जगदेव व विमोग म्हात्रे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरा रोड - भाईंदरच्या मोरवा गावात असलेली ७७ वर्षीय वृद्ध महिलेची जमीन खोटी कागदपत्रे बनवून बळकावणाऱ्या बाप - लेका विरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेकोरेटर जगदेव म्हात्रे व त्याचा मुलगा विमोग हे दोघे आरोपी आहेत.
भाईंदरच्या राई गावात राहणाऱ्या जयश्री प्रभाकर म्हात्रे ह्या ७७ वर्षीय वृद्धेच्या फिर्यादीवरून भाईंदर पोलीस ठाण्यात मोरवा गावातील शागिर्द डेकोरेटर चे जगदेव व विमोग म्हात्रे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयश्री यांची मोरवा गावात नवीन सर्वे क्र. ३/२६ ही सुमारे सव्वा तीन गुंठे इतकी जमीन आहे. सदर जमिनीवर महापालिकेने नाट्यमंच बांधलेला आहे. पालिकेने कोणतीच परवानगी न घेता रंगमंच बांधला असल्याने तो पाडून टाकावा अशी तक्रार जयश्री यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये पालिका आयुक्तांना दिली होती. त्यांच्या मुलांनी सातबारा ची माहिती घेतली असता गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जगदेव याने जयश्री व कुटुंबियांच्या २००० सालातील कुलमुखत्यार द्वारे ती जमीन मुलगा विमोग याला नोंदणीकृत करारनामा करून विक्री केल्याचे आढळून आले.
माहिती अधिकारात सर्व कागदपत्रे घेतल्यावर जगदेव व विमोग यांनी बनावट कुलमुखत्यार पत्रद्वारे जमीन लाटल्याची तक्रार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या कडे करण्यात आली होती. अखेर या प्रकरणी चौकशीत तथ्य आढळून आल्यावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगदेव याचा डेकोरेटरचा मोठा व्यवसाय असून पोलीस, महापालिका व महसूल अधिकारी, राजकारणी आदींशी कामाच्या निमित्ताने सलगी आहे. जगदेव याने सरकारी जमिनीवरील कांदळवन नष्ट करून कब्जा केल्याच्या तक्रारी देखील ग्रामस्थांनी सातत्याने चालवल्या आहेत.