एटीएम कॅश व्हॅनसह ७८ लाख पळविले; आरोपींना १२ वर्षांनंतर अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 11:22 AM2023-05-25T11:22:29+5:302023-05-25T11:22:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एटीएम कॅश व्हॅनसह ७८ लाख पळविण्याच्या सुमारे १२ वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा शोध घेऊन दोन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एटीएम कॅश व्हॅनसह ७८ लाख पळविण्याच्या सुमारे १२ वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा शोध घेऊन दोन आरोपींना कांदिवली पोलिसांनी अटक केली. अरुण वाघमारे आणि सतीश आगळे अशी या दोघांची नावे आहेत.
या दोघांनी २०१२ मध्ये एटीएम कॅश व्हॅनसह सुमारे ७८ लाख रुपयांची रक्कम घेऊन पळ काढला होता. संशयितांचे माजी सहकारी २०१२ मध्ये एमजी रोड येथील एटीएममध्ये काही रक्कम भरण्यात व्यस्त असताना ही घटना घडली होती. कॅश व्हॅन वाघमारे चालवत असल्याने त्याने व्हॅनमधील पैसे, वाहनासह पळ काढला. त्यानंतर वाहन कांदिवलीतील एका निर्जनस्थळी सोडून ते पसार झाले होते. या घटनेनंतर हे दोघे जवळपास १२ वर्षे फरार होते. पोलिसांनी वाघमारेकडून ३१ लाख रुपये हस्तगत केले. दहिसरच्या कांदरपाडा परिसरात त्याने प्लास्टिकमध्ये गुंडाळून काही रोख रक्कम पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये ठेवली आणि उर्वरित घेऊन पळून गेला होता. पोलिस उपनिरीक्षक नितीन साटम यांच्यासह चार अधिकाऱ्यांचे पथक सांगलीला रवाना झाले आणि त्यांनी वाघमारेला वेकसेनवाडी विश्रामबाग परिसरातून अटक केली, तर सतीशचे मूळ गाव असलेल्या लातूर जिल्ह्यातील खेडे येथून २१ मे रोजी त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, त्यांची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
गुन्ह्यानंतर वाघमारे सांगलीत मजूर म्हणून काम करत होता. सतीशही त्याच्या मूळ गावी पालकांसह राहत होता. मात्र, वाघमारे हाच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार होता, जो अवघ्या दहा दिवसांपूर्वी कंपनीत कामाला लागला आणि संधी साधून वाहनांसह ७८ लाख रुपये घेऊन पळाला, असे पोलिसांनी सांगितले.