पुण्यात पॅरोलवर सुटल्यानंतर आरोपींकडून हुल्लडबाजी, ८ आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 08:44 IST2020-05-30T08:43:38+5:302020-05-30T08:44:01+5:30
गंभीर बाब म्हणजे त्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचार्यांचा समावेश असल्याने पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यात पॅरोलवर सुटल्यानंतर आरोपींकडून हुल्लडबाजी, ८ आरोपींना अटक
पुणे /येरवडा : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींची पॅरोलवर येरवडा कारागृहातून सुटका झाल्यावर हुल्लडबाजी करत जाणार्या ८ जणांना विश्रांतवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल, पाच काडतुसासह ४ आलीशान कार जप्त केल्या आहेत.
गंभीर बाब म्हणजे त्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचार्यांचा समावेश असल्याने पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस कर्मचारी शरीफ बबन मुलाणी (वय ३६ रा. इंद्रायणीनगर, भोसरी) त्याच्यासह आझाद शेखलाल मुलाणी (वय ३०, रा. तळवडे चिखली), आदेश दिलीप ओकाडे (वय २१ रा. सुयोग नगर, निगडी), मुबारक बबन मुलाणी (वय ३८ रा. मोरेवस्ती चिखली) संदीप किसन गरुड (वय ४० रा. तळेगाव दाभाडे), हुसेन जाफर मुलाणी (वय ४३) सिराज राजू मुलाणी (वय २२) विनोद नारायण माने (वय २६ तिघेही रा. कोळवण, मुळशी) यांच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबतची माहिती अशी, शुक्रवारी रात्री पौड येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी समीर मुलाणी व जमीर मुलाणी यांची येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटका करण्यात आली. ते सुटणार यासाठी त्याचे भाऊ, नातेवाईक मित्र पिंपरी चिंचवड, मुळशी,भोसरी,चिखली परिसरातून येरवडा जेल परिसरात आले होते. येरवडा कारागृहातून बाहेर पडल्यावर आरोपी हे त्याचे २० ते २५ नातेवाईक व समर्थक यांच्यासह दुचाकी व चारचाकी गाड्यांमधून हुल्लडबाजी करीत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोरून निघाले होते. त्यांचा पाठलाग करत विश्रांतवाडी पोलिसांनी फुलेनगर येथील आरटीओ चौक याठिकाणी त्यातील एक चारचाकी गाडी अडवली. इतर समर्थकांना देखील गाड्यांसह थांबण्यास सांगितले. चारचाकी गाडीतून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, काडतुसे व लोखंडी बार अशी घातक शस्त्र जप्त करण्यात आली. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला सोडवण्यासाठी आलेल्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचार्यांसह ८ जणांवर विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, गुन्हे निरीक्षक रवींद्र कदम यांच्यासोबत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन कडील अधिकारी व कर्मचारी यांनी ही कामगिरी केली. घटनास्थळी पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांनी भेट घेऊन तपासाच्या सूचना दिल्या. कोरोना आजाराच्या वाढत्या संसगार्चा पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहातून गंभीर गुन्ह्यातील सहित आरोपींची पॅरोलवर सुटका करण्यात येत आहे. त्यांना सोडवण्यासाठी येणारे समर्थक नातेवाईक यांची मोठी गर्दी येरवडा कारागृह बाहेर जमत आहे. परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने येरवडा कारागृहाबाहेर जमणार्या समर्थकांकडून गंभीर गुन्हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.