सातारा रिमांड होममधून २ दिवसांत ८ मुले पळाली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 05:45 AM2019-06-28T05:45:39+5:302019-06-28T05:45:50+5:30
बालसुधारगृहामधून (रिमांड होम) गेल्या दोन दिवसांमध्ये आठ अल्पवयीन मुले पळून गेली आहेत. यातील एका मुलाला वाई परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सातारा : सदरबझार येथील बालसुधारगृहामधून (रिमांड होम) गेल्या दोन दिवसांमध्ये आठ अल्पवयीन मुले पळून गेली आहेत. यातील एका मुलाला वाई परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या बालसुधारगृहात विधिसंघर्ष बालके ठेवली जातात. मंगळवारी येथून चार अल्पवयीन मुलांनी पलायन केले होते. या प्रकरणी सातारा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
तपास सुरु असतानाच बुधवारी रात्री उशिरा आणखी चार मुले बालसुधारगृहातील रूमच्या उघड्या पत्र्यातून पळून गेली. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गुरुवारी बालसुधारगृहाला भेट
देऊन सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या.
या सर्व मुलांनी ठरवून पलायन केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, ही घटना गंभीर असून, बालसुधारगृहातील सुरक्षा वाढविणे गरजेचे आहे.
बालसुधारगृहाचे सेफ्टी आॅडिट पोलिसांनी करावे, अशी सूचना जिल्हा न्यायाधिशांनी केल्याची माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
बालसुधारगृहातून मुलांनी पलायन केल्यानंतर वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीना आत प्रवेश दिला गेला नाही. तसेच बालसुधारगृह अधीक्षक व फिर्याद देणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही माहिती देण्यास नकार दिला.