शास्त्रज्ञाच्या खात्यातून ८ महिन्यांत ८ लाख गायब, सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 10:20 AM2023-06-20T10:20:29+5:302023-06-20T10:20:44+5:30
मुलुंड कॉलनी परिसरात राहणारे तक्रारदार अर्चनकुमार हे मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत.
मुंबई : ऑनलाइन अंशकालीन काम देण्याच्या नावाखाली मुलुंडमधील एका खासगी कंपनीतील शास्त्रज्ञाच्या खात्यातून ८ महिन्यांत ८ लाख गायब झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या फसवणुकीच्या घटनेबाबत त्यांनी मुलुंड पोलिसांकडे धाव घेतली असून, पोलिसांनी सायबर भामट्याविरोधात गुन्हा नोंदविला असून, अधिक तपास चालू आहे.
मुलुंड कॉलनी परिसरात राहणारे तक्रारदार अर्चनकुमार हे मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत. ते एका नामांकित बहुराष्ट्रीय फार्मा कंपनीच्या विभागात विष विज्ञान शास्त्रज्ञ (टॉक्सिलॉजी सायंटिस्ट) पदावर नोकरी करतात. सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांनी नोकरीच्या शोधात नोकरी डॉट कॉम या वेबसाइटवर आपली माहिती अपलोड केली होती.
गेल्या वर्षी २६ मेला अर्चनकुमार यांना व्हॉट्सॲपवर एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने आपले नाव रमेश असल्याचे सांगत, तुम्हाला ऑनलाइन पार्ट टाइम जॉबबाबत विचारणा केली. अर्चनकुमार यांचा होकार येताच, त्यांनी टेलिग्राम ॲपवर एक लिंक पाठविली.
अर्चनकुमार यांनी या लिंकमध्ये आपली सर्व माहिती भरून नोंदणी करत, २०० रुपये एका यूपीआय आयडीवर पाठविले. ही रक्कम त्यांच्या खात्यात दिसू लागली.
त्यांना ऑनलाइन शॉपिंग करायला लावले. त्याच्या मोबदल्यासह वाढीव रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत असल्याने त्यांचाही विश्वास बसला. पुढे जास्तीच्या आमिषापोटी ८ महिन्यांत खात्यातून ८ लाख रुपये गेले, तरी टास्क पूर्ण होत नसल्याने त्यांना संशय आला.