पिंपरी चिंचवडच्या स्थायी अध्यक्षाच्या स्वीय सहायकाच्या केबिनमध्ये आढळले बेकायदा लाखो रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 09:52 AM2021-08-19T09:52:58+5:302021-08-19T09:56:33+5:30
Pimpri Chinchwad News : स्थायी समिती अध्यक्षाच्या स्वीय सहायकाच्या केबिनमध्ये ८ लाखांहून अधिक बेकायदा रक्कम आढळून आली आहे.
पुणे - पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या तीन कर्मचार्यांसह लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पाच जणांना अटक केली आहे. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी पालिकेत छापा घातला. त्यावेळी स्थायी समिती अध्यक्षाच्या स्वीय सहायकाच्या केबिनमध्ये ८ लाखांहून अधिक बेकायदा रक्कम आढळून आली आहे. या कारवाईनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तातडीने अध्यक्ष आणि स्वीय सहायक यांच्या घरावर छापे घातले असून ही झडतीची कारवाई पहाटेपर्यंत सुरू होती.
स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, मुख्य लिपिक व स्थायी समितीचे अध्यक्षांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे, लिपिक विजय शंभुलाल चावरिया, संगणक चालक राजेंद्र जयवंतराव शिंदे, शिपाई अरविंद भिमराव कांबळे अशा पाच जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या जागेमध्ये होडिंग उभारण्यासाठी भरलेल्या २८ निविदा मंजूर झाल्यानंतर असून त्याचे वर्क ऑर्डर मिळविण्यासाठी प्रत्येकी २ टक्के लाच मागण्यात आली होती. त्यापैकी १ लाख १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तेथील लिपिक विजय चावरिया व राजेंद्र शिंदे व शिपाई अरविंद कांबळे यांच्या मार्फत स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते.