८ वर्षीय मुलीवर बलात्कार अन् हत्या प्रकरणी १४० दिवसांत मिळाला न्याय; गुन्हेगाराला फाशीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 07:00 PM2021-07-15T19:00:11+5:302021-07-15T19:01:31+5:30
पीडित मुलीच्या वडील कोर्टाच्या निर्णयावर म्हणाले की, आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याने शांती मिळाली. परंतु जोपर्यंत आरोपी फासावर लटकत नाही तोपर्यंत आत्मा शांत होणार नाही.
बुलंदशहर – उत्तर प्रदेशमधील बुलंदशहराच्या विशेष पॉक्सो कोर्टाने मोठा निर्णय सुनावला आहे. बलात्कारानंतर ८ वर्षाच्या मुलीचा गळा दाबून हत्या करणाऱ्या आरोपी हरेंद्रला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. न्या. पल्लवी अग्रवाल यांनी आरोपी हरेंद्रला फाशीच्या शिक्षेसोबतच १ लाख २० हजारांचा दंड ठोठावला आहे. घटनेच्या १४० दिवसानंतर कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
पीडित मुलीच्या वडील कोर्टाच्या निर्णयावर म्हणाले की, आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याने शांती मिळाली. परंतु जोपर्यंत आरोपीला फाशी मिळत नाही तोपर्यंत आत्मा शांत होणार नाही. बुलंदशहराच्या कोतवाली हद्दीतील एका गावात २५ फेब्रुवारीला पत्नी आणि दोन मुली शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. जेवण झाल्यानंतर छोटी मुलगी पाणी पिण्यासाठी जवळीत हरेंद्रच्या घरी गेली. खूप वेळ झाला तरी मुलगी परतली नाही त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
या मुलीचा मृतदेह पोलिसांनी हरेंद्रच्या घराबाहेरील अंगणात पुरल्याचं आढळून आलं. त्यानंतर ३ मार्चला पोलिसांनी आरोपी हरेंद्रला बेड्या घातल्या. दारू पिल्यानंतर मुलीसोबत अश्लिल कृत्य केले. हे कृत्य जगासमोर आल्यास भीतीपोटी मी मुलाचा गळा दाबून हत्या केली आणि घरासमोरील एका खड्ड्यात तिचा मृतदेह गाडला आणि फरार झालो अशी कबुली आरोपी हरेंद्रनं दिली. आरोपीच्या अटकेनंतर पोलिसांनी आरोपपत्र दाखल करून स्थानिक कोर्टात केस दाखल केली. त्यानंतर आरोपीला जेलला पाठवलं.
पॉक्सो कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. गुरुवारी या प्रकरणात कोर्टाने आरोपीला दोषी ठरवलं. एडीजीसी सुनील कुमार शर्मा यांनी सांगितले की, हरेंद्रला दोषी ठरवत हत्या, बलात्कार आणि पॉक्सो कायद्यातंर्गत फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर १ लाख २० हजारांचा दंड ठोठावला आहे. माझ्या मुलीला न्याय मिळाला पण तिच्या आत्म्याला तेव्हाच शांती मिळेल जेव्हा गुन्हेगार फासावर लटकेल. आरोपीच्या वकिलांनी सर्वबाजूने आमच्यावर दबाव बनवला होता. तीन एकर जमीन नावावर करण्याचं आमिषही दाखवलं. परंतु कुणतीही तडजोड करण्यास आम्ही नकार दिला असं पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले.