८० कोटींचा पाऊस प्रकरण : पीडितेच्या आईला अटक; उलगडणार अनेक रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 05:16 PM2021-04-11T17:16:24+5:302021-04-11T17:17:29+5:30

Crime News : आरोपी संख्या पाेहचली पाचवर; पीडितेच्या आईला अटक झाल्याने आता या प्रकरणातील  रहस्य उलगडण्याची शक्यता आहे.

80 crore rain case: Victim's mother arrested; Many secrets to unravel! | ८० कोटींचा पाऊस प्रकरण : पीडितेच्या आईला अटक; उलगडणार अनेक रहस्य!

८० कोटींचा पाऊस प्रकरण : पीडितेच्या आईला अटक; उलगडणार अनेक रहस्य!

Next
ठळक मुद्दे अघोरी कृत्यातून पीडितेला विवस्त्र करीत गुप्तधन मिळविण्याच्या हव्यासापोटी पीडितेची आई, काकासह आणखी तिघांनी पीडितेचे वर्षभरापासून शोषण केले.

 वर्धा : ८० कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून आईसह नातलगांनी पीडितेवर अघोरी कृत्य करून तिचे वर्षभरापासून शोषण केल्याची लज्जास्पद घटना तीन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. याप्रकरणात पीडेतेच्या काकासह तिघांना अटक करण्यात आली होती. रामनगर पोलिसांनी शनिवारी रात्री याप्रकरणात आता पीडितेच्या आईला हिंगणघाट तालुक्यातील येरणगाव येथून अटक केल्याची माहिती असून आरोपी संख्या पाचवर पोहचली आहे. पीडितेच्या आईला अटक झाल्याने आता या प्रकरणातील  रहस्य उलगडण्याची शक्यता आहे.


अघोरी कृत्यातून पीडितेला विवस्त्र करीत गुप्तधन मिळविण्याच्या हव्यासापोटी पीडितेची आई, काकासह आणखी तिघांनी पीडितेचे वर्षभरापासून शोषण केले. असे बयाण स्वत:  पीडितेनेच पोलिसांसमक्ष दिल्याने समाजमन सुन्न झाले. पोलिसांनी अंनिसच्या मदतीने बालू उर्फ प्रवीण मंगरूळकर आणि किशोर सुपारे यांना अटक केली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी  आरोपी प्रवीण पाटील आणि दीपक कांबळे यांना अटक केली होती. दरम्यान रामनगर पोलिसांनी शनिवारी पीडितेच्या आईला अटक केली असून सर्व आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विष्णू भांडवले यांनी दिली. 


विशेष म्हणजे पीडितेची आई आणि एक महिला या दोघी वर्ध्यातील शिवाजी चौकात असलेल्या एका हॉटेलमध्ये काम करीत होत्या. तेथूनच दोघांत मैत्री झाली. महिलेने पीडितेच्या आईला तुमच्या वरील कर्ज फेडायचे असेल तर आपल्याजवळ एक ‘डीआर’(मांत्रिक) आहे तो पैशाचा पाऊस पाडतो असे सांगितले. त्यानंतर ती महिला आणि पीडितेची आई पीडितेला घेवून चंद्रपूर येथे गेल्या. तेथे डिआर येणार होता. पण, तो आला नाही. त्यामुळे तिघांनीही तेथेच मुक्काम केला. त्या महिलेच्या संपर्कातून बालू उर्फ प्रवीण मंगरूळकर हा पीडितेच्या आईच्या संपर्कात आला. बालूने पीडितेच्या आईला डिआर काय करतो, पैशांचा पाऊस कसा पाडतो, हे सर्व समजावून सांगितले. पैशाच्या आमिषाने पीडितेची आई देखील याला तयार झाली. आणि पीडितेवर वर्षभर विविध अघोरी कृत्य करण्यात आले. त्यामुळे पीडितेच्या आईलाही याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. 

‘ती’ महिला कोण ?
पीडितेच्या आईला भेटलेली महिला कोण आहे, तिचा आणि ‘डिआर’चा  संपर्क कसा आला, या सर्व गोष्टींचा सखोल तपास करण्याची गरज आहे. त्या महिलेने यापूर्वीही अनेक मुलींना पैशाच्या आमिषातून फसविल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या महिलेचा शोध घेवून तिला अटक करण्याची गरज आहे. 

संथ गतीने सुरू आहे तपास 
बालू उर्फ प्रवीण मंगरूळकर हा ‘डिआर’ (मांत्रिक) याला ‘कुवारां पेपर’(पीडिता) यांचे फोटो, त्यांचे नाव, वजन, पत्ता, उंची आदी वैयक्तीक माहिती एका कागदावर लिहून त्याचा फोटो डिआरच्या मोबाईलवर पाठवित असल्याची माहिती आहे. इतकेच नव्हेतर त्याने पीडितेचाही विवस्त्र व्हिडीओ मोबाईलमध्ये काढल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलची सखोल तपासणी केल्यास अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता असून अनेक महिला, मुली यातून मुक्त होण्याची शक्यता आहे.
 त्यामुळे पोलिसांनी तपासाला गती देण्याची यावी, तसेच या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात यावा, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात आली आहे.

‘डिआर’च्या शोधात पथक रवाना 
याप्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य सुत्रधार डिआर मात्र, अजूनही फरार आहे. डिआरच्या शोधार्थ रामनगर ठाण्यातील पोलीस पथक रवाना झाले असून लवकरच त्यालाही अटक करण्यात येणार आहे. याप्रकरणात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता असून पोलीस तपास करीत असल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विष्णू भांडवले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.



अंनिससह विविध सामाजिक संघटना पीडितेसोबत उभ्या आहेत. प्रकरणाचा सखोल तपास केल्यास आरोपींचे तार राज्यातील अनेक जिल्ह्यातील मांत्रिकांशी जुळलेले असल्याचे पुढे येईल. पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषातून अनेक मुली, महिलांचा छळ होत आहे. बदनामीच्या भीतीते कुणी तक्रार देण्यास पुढे येत नाही. मात्र, अशा मुली, महिलांनी न घाबरता पोलिसांना किंवा अंनिसला माहिती देऊन संपर्क करावा, आरोपींवर नक्कीच कारवाई करण्यात येईल. - पंकज वंजारे, राज्य संघटक, अंनिस.

Web Title: 80 crore rain case: Victim's mother arrested; Many secrets to unravel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.