80 लाखांचा विमा अन् भिकाऱ्याची हत्या; 17 वर्षांनंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 08:04 PM2023-11-08T20:04:40+5:302023-11-08T20:07:16+5:30
या प्रकरणामुळे पोलिसही चकीत झाले आहेत.
Crime News: अहमदाबाद क्राइम ब्रँचने एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला आहे. 17 वर्षांपूर्वी कार अपघातात जळून मृत्यू झालेल्या एका व्यक्तीला अटक केले आहे. तुम्हाला वाचून धक्का बसेल, पण अपघातात या व्यक्तीचा मृत्यू झालाच नव्हता. विम्याची रक्कम मिळवण्यासाठी त्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसही अचंबित झाले आहेत.
सविस्तर माहिती अशी की, एका व्यक्तीने स्वतःच्या नावावर 80 लाख रुपयांचा विमा काढला होता. ही विम्याची रक्कम मिळवण्यासाठी त्या व्यक्तीने एका भिकाऱ्याचा खुन केला आणि त्याचा मृतदेह कारच्या सीटवर ठेवून जाळून टाकला. या घटनेनंतर कार अपघातात स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव केला. राजकुमार असे या आरोपीचे नाव असून, अहमदाबाद गुन्हे शाखेने त्याला मनमोहन नगर येथून अटक केली आहे.
राजकुमारने अत्यंत हुशारीने एलआयसी इन्शुरन्समधून 80 लाख रुपये मिळवले होते. राजकुमारचे खरे नाव अनिल असून तो उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले. राजकुमारच्या नावाने बनावट कागदपत्रे बनवून तो 2006 पासून अहमदाबादमध्ये राहत होता.
अटक करण्यात आलेल्या आरोपीने त्याच्या कुटुंबीयांसह रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे भासवून विम्याची रक्कम मिळावली होती. यासाठी आरोपींनी 2006 साली आग्र्यातून एका भिकाऱ्याला गाडीत बसवले आणइ त्याला मादक पदार्थ देऊन बेशुद्ध केले. यानंतर आरोपींनी भिकाऱ्याला गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसवले आणि गाडी पेटवून दिली. अपघातानंतर आरोपीने कागदावर स्वत:ला मृत दाखवले. आरोपीच्या कुटुंबीयांनी विमा कंपनीकडून 80 लाख रुपयेही मिळवले. आता गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींची कारागृहात रवानगी केली आहे.