पिंजऱ्यावर चादर टाकून 'तो' एक्स्प्रेसनं ठाण्यात आला, पोलिसांनी पाहिलं तर धक्काच बसला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 09:10 PM2022-03-14T21:10:53+5:302022-03-14T21:12:04+5:30
पोपट घरात बाळगणे हे बेकायदेशीर असले तरी पोपटाची तस्करी सुरूच आहे.
ठाणे :
पोपट घरात बाळगणे हे बेकायदेशीर असले तरी पोपटाची तस्करी सुरूच आहे. वाशिम जिल्ह्याच्या जंगलातून ठाण्यात पोपटांच्या तस्करीसाठी आलेल्या मोहम्मद रिजवान नाझरे (२५, रा. कारंजा, जिल्हा वाशिम) या तरुणाला ठाणे वनविभागाने सापळा रचून ठाणे रेल्वेस्थानक परिसरातून रविवारी अटक केली. त्याच्याकडून पिलांसहित ८० पोपट ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अमरावती येथून मूर्तिजाफकर एक्स्प्रेसने प्रवास करून १३ मार्च २०२२ रोजी ठाणे स्थानकात रिझवान उतरला. लोखंडी पिजऱ्यावर कापड लपेटून तो पोपटाची विक्रीसाठी आला होता. त्याचा हा संशयास्पद प्रकार एका दक्ष नागरिकाने फोनद्वारे ठाणे वन परिक्षेत्र विभागाला दिली. त्यानुसार सापळा रचून ठाणे स्थानकासमोरील एसटी डेपो जवळून जात असताना रिजवानला पकडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे यांनी दिली.
दोन मोठ्या लोखंडी पिंजऱ्यामध्ये हे पोपट ठेवले होते. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने पिंजऱ्यांवर चादर ठेवली होती. वाशिम जिल्ह्यातील जंगलातून ते आणल्याचा संशय वन विभागाला आहे. रजिवानकडून या तस्करीची आणखी माहिती मिळण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. वन परिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे, अशोक काटेसकर, संदीप मोरे, दत्तात्रय पवार आणि रोहित मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली