तस्करीतील ८२ जनावरांची सुटका, अपर पोलीस अधीक्षकांची कारवाई : तीन ट्रक जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 05:21 PM2021-06-01T17:21:12+5:302021-06-01T17:21:58+5:30
Smuggling Case : नागभीड मूल मार्गे जनावरांची अवैध तस्करी तेलंगनाकडे होत असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली.
चंद्रपूर : जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन ट्रकवर एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करुन अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकणी यांनी ८२ जनावरांची सुटका केली. या कारवाईत मोहमद्द तौसीफ अ. मतीन शेख, शाहीद हुसेन अफजल हुसेन, ताहीर शेख मतीन शेख रा. अड्याळ यांच्यासह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागभीड मूल मार्गे जनावरांची अवैध तस्करी तेलंगनाकडे होत असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. त्यांनी लगेच मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे यांना माहिती दिली. त्यानी दोन पथके गठित करुन मूल चार्मोशी व सिंदेवाही परिसरात नाकाबंदी केली. दरम्यान चार्मोशी नाका मूल येथे एमएच ४० बीएल ८६५२ या ट्रकमध्ये २३ जनावरे आढळून आली. पोलिसांनी सर्व १२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन मोहम्मद तौसीफ अ. मतीन शेख याला अटक केली.
पोलिसांनी एका ट्रकवर कारवाई केल्याची माहिती इतर दोन्ही ट्रकचालकाला मिळताच त्यानी ट्रक वळवून नागभीडकडे पळ काढला. दरम्यान दुसऱ्या पथकाला सिंदेवाही येथील शिवाजी चौकात नाकाबंदी केली. मात्र ट्रकचालक विरुद्धदिशेन ट्रक पळवून नागभीडकडे पळाला. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केला. तसेच नागभीड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी टी-पाईंट नागभीड येथे नाकाबंदी करुन विना नंबरच्या आयशर ट्रकमधून २३ जनावरांची सुटका केली. या कारवाईत २७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन ट्रकचालकास ताब्यात घेतले. दरम्यान नागभीड-तुकूम गावातून गोसीखुर्द कॅनलच्या रोडवर ट्रक क्र. एम. एच ३६ एफ ३२८९ या ट्रकमधून ३६ जनावरांची सुटका करुन शाहीद हुसेन, ताहीर मतीन शेख व अन्य दोन जणांवर नागभीड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अतुल कलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखली मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मानिक कुमरे, तानू रायपूरे, वाल्मिक मेश्राम, महेश पतरंगे, नरेंद्र अंडेलकर, प्रभाकर गेडाम, विजय जीवतोडे यांनी केली.