अबब! एअरपोर्टवर महिला प्रवाशाच्या शरीरातून काढल्या ८२ कॅप्सूल; किंमत ऐकून...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 08:36 AM2022-12-18T08:36:29+5:302022-12-18T08:36:42+5:30
अधिकाऱ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले, तेथे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासात तिच्या शरीरात काही गोष्टी असल्याचे आढळून आले.
नवी दिल्ली - गिनी देशातील एका महिला प्रवाशाला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Delhi IGI Airport) पकडण्यात आले. खबऱ्याकडून माहिती मिळताच कस्टम अधिकाऱ्यांनी संबंधित महिलेला थांबवून चौकशी केली. यावेळी अधिकाऱ्यांना काही शंका आल्या. महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या शरीरात ८२ कोकेननं भरलेल्या कॅप्सूल असल्याचं आढळल्यानं खळबळ माजली.
यानंतर वैद्यकीय प्रक्रियेअंतर्गत डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्या शरीरातून कॅप्सूल काढण्यात आले. या कॅप्सूलची किंमत १५.३६ कोटी रुपये असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. महिलेविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
माहितीच्या आधारे कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलेला पकडले. ही महिला ग्रीन चॅनल पार करून इंटरनॅशनलच्या दाराबाहेर पडण्यासाठी त्या दिशेने येत होती. महिलेने अंमली पदार्थाच्या कॅप्सूल गिळल्याचे चौकशीत अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर अधिकाऱ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले, तेथे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासात तिच्या शरीरात काही गोष्टी असल्याचे आढळून आले. त्यानंतर ते कॅप्सूल हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अनेक दिवस ही प्रक्रिया सुरू होती.
कॅप्सूलमधून काढली १०२४ ग्रॅम सफेद पावडर
विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, ८२ कॅप्सूलमधून एकूण १०२४ ग्रॅम सफेद पावडरीचा चुरा बाहेर काढण्यात आला. त्याची चौकशी केली असता ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. त्याची किंमत अंदाजे १५.३६ कोटी रुपये आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी महिलेविरुद्ध अमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे.