अॅट्रॉसिटीची धमकी देऊन उकळली ८.४० लाखांची खंडणी, एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 07:42 PM2020-09-05T19:42:32+5:302020-09-05T19:46:17+5:30
शाहूपुरी पोलिसांची कारवाई
सातारा : अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन ८ लाख ४० हजारांची खंडणी उकळल्याप्रकरणी चंद्रकांत दादासो साठे ऊर्फ बाळू साठे (वय ३५, रा. शाहू बोर्डिंगजवळ, व्यंकटपुरा पेठ, सातारा) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शंकरराव गुलाबराव निंबाळकर (वय ५२, रा. गडकर आळी शाहुपूरी, सातारा) हे २०१५ पासून कोटेश्वर मंदिरात भजनासाठी जातात.
तेथे बाळू साठे हा ढोलकी वाजविण्यास यायचा. त्यामुळे त्यांच्याशी शंकरराव निंबाळकर यांची ओळख झाली. २०१८ मध्ये साठे याने निंबाळकर यांना भाजी विक्रीच्या व्यवसायासाठी तीन लाख मागितले. मात्र, निंबाळकर यांनी पैसे देण्यास नकार दिला. परंतु साठे याने पैसे दिले नाहीत तर तुमच्यावर अॅट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी दिली. खोटा गुन्हा नोंद होण्याच्या भीतीपोटी निंबाळकर यांनी बाळू साठेला रोख स्वरूपात तीन लाख रुपये दिले. त्यानंतरही साठे याने वेळोवेळी निंबाळकर यांना अॅट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कोल्हापूर येथील करवीर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे, तो माघारी घ्यायचा आहे, अशी खोटी माहिती देऊन निंबाळकर यांच्याकडे त्याने पैशाची मागणीही केली. निंबाळकर यांची सामाजिक पत धोक्यात आणण्याची भीती घालून त्यांच्याकडून साठे याने एकूण ८ लाख ४० हजार रोख स्वरुपात घेतले.
दरम्यान, शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी पुन्हा निंबाळकर यांना बाळू साठे याने दोन लाखांची मागणी केली. या प्रकाराला कंटाळून अखेर निंबाळकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी बाळू साठेवर खंडणीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला पोलिसांनी तत्काळ अटक केली. न्यायालयासमोर त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली. सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे, मोहन पवार, पंकज मोहिते, सुनिल मोहरे यांनी संशयित आरोपी बाळू साठे याला अटक केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे हे तपास करत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा
बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल
महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर
मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक