कूलर विकत घेण्याच्या बहाण्याने ८४ हजारांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 03:09 AM2021-03-30T03:09:59+5:302021-03-30T03:10:26+5:30
Crime News : एअर कूलर विकत घेण्याच्या बहाण्याने एका बांधकाम व्यावसायिकाला ८४ हजार रुपयांचा फटका बसला आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई : एअर कूलर विकत घेण्याच्या बहाण्याने एका बांधकाम व्यावसायिकाला ८४ हजार रुपयांचा फटका बसला आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.
मलबार हिल परिसरात ५८ वर्षीय तक्रारदार व्यावसायिक राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीने ओएलएक्सवर एअर कूलर विक्रीसाठी ठेवला होता. तेव्हा २१ मार्च रोजी नरेश नावाच्या व्यक्तीने फोन करून एअर कुलर घेण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर गुगल पेबाबत अधिक तपशील मागवला. तक्रारदार यांचे गुगल पेवर खाते नसल्याने त्यांनी मुलीला संबंधित व्यक्तीसोबत बोलण्यास सांगितले. संबंधित व्यक्तीने मुलीकडून गुगल पेची माहिती घेत एक रुपया ट्रान्सफर केला. पुढे मुलीला क्यूआर कोड पाठवून स्कॅन करण्यास सांगितला. तो स्कॅन करताच खात्यातून २ हजार रुपये कमी झाले. मुलीने याबाबत विचारणा करताच चुकून पैसे डेबिट झाल्याचे सांगून ५०० रुपये पुन्हा पाठवले. पुढे आणखीन क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगून तरुणीच्या खात्यातील ८४ हजार रुपयांवर हात साफ केला. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. त्यानुसार तक्रारदार यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. मलबार हिल पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.