खामगावात पाळत ठेवून ८५ हजार लांबविले; पाठलाग करताच ३५ हजार फेकले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 08:25 PM2023-07-10T20:25:12+5:302023-07-10T20:25:40+5:30
खामगावात पाळत ठेवून दुचाकीच्या डिक्कीतून ८५ हजार लांबविले, पाठलाग केल्यानंतर ३५ हजार फेकले रस्त्यावर
खामगाव : दुचाकीच्या डिक्कीतून ८५ हजार रुपये लांबविण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी फरशी भागात घडली. ही घटना घडल्यानंतर काहींनी संबंधितांचा पाठलाग केला असता, चाेरट्याने काही नोटा रस्त्यावर भिरकावून पळ काढला.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, खामगाव येथील नटराज गार्डनजवळील रहिवासी पवन शर्मा यांनी सकाळी ११:३० वाजता एका बँकेतून ८५ हजारांची रक्कम काढली. ही रक्कम दुचाकीच्या िडक्कीत ठेवली. त्यानंतर पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी फरशीवर गेले. दरम्यान, शर्मा यांच्या दुचाकीच्या डिक्कीतील ८५ हजारांची रक्कम चोरून चोराने घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना काही नागरिकांच्या निदर्शनास येताच, त्यांनी चोरट्याचा पाठलाग केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पवन शर्मादेखील त्यांच्या मागे धावले. त्यावेळी काही रक्कम रस्त्यावर फेकून पानट गल्लीमार्गे फरशी पुलावरून चोरट्याने पलायन केले. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला. याप्रकरणी पवन शर्मा यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.
५३ हजार पळविले
नागरिकांनी पाठलाग आणि आरडाओरड केल्यानंतर चोरट्याने ३२ हजारांच्या नोटा भिरकावून घटनास्थळावरून पळ काढला. ८५ हजारांपैकी ३२ हजार रुपये परत मिळाले. दरम्यान, ५३ हजारांच्या रकमेवर चोरट्याने दिवसाढवळ्या डल्ला मारल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच गांधी चौकातून दुचाकीच्या डिक्कीतून साडेसहा लाख रुपयांची रक्कम लुटण्यात आली होती. त्यानंतर आता शर्मा यांची ५३ हजारांची रक्कम चोरट्याने पाळत ठेवून पळविली. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.