कॅफे स्फोट प्रकरणाचं ८६ मिनिटांचं रहस्य; १०० मीटरवरून संशयित CCTV तून गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 10:44 AM2024-03-02T10:44:57+5:302024-03-02T10:46:59+5:30
बंगळुरू कॅफेमध्ये स्फोट घडवणाऱ्या आरोपीची ओळख पटलेली आहे. ज्याचे वय २८ ते ३० वर्ष असल्याचा अंदाज आहे.
नवी दिल्ली - Bengaluru Rameshwaram Cafe Blast ( Marathi News ) कर्नाटकच्या रामेश्वरम कॅफेत शुक्रवारी झालेल्या स्फोटाची सखोल चौकशी करण्यात तपास यंत्रणा गुंतल्या आहेत. तपासात एक एक धागा जोडताना पोलिसांसमोर आता ८६ मिनिटांचं रहस्य सोडवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. कॅफेत आरोपी येणे, फूड ऑर्डर करणे, जागेवर बसणे, तिथून निघून जाणे आणि नंतर स्फोट घडणे हे सर्वकाही ८६ मिनिटांत झाले. तपास यंत्रणा प्रत्येक सेकंदाची माहिती घेत आहे. आसपासचे सीसीटीव्ही फुटेज शोधत आहे. ज्यातून कॅफेतून निघाल्यानंतर आरोपी कुठे आणि कोणत्या दिशेने गेला? याचा शोध घेतला जात आहे.
१०० मीटरनंतर संशयित झाला गायब
आतापर्यंत झालेल्या तपासात समोर आले आहे की, आरोपी युवक जेव्हा कॅफेच्या बाहेर पडतो, तेव्हा कॅफेपासून १०० मीटर अंतरापर्यंत तो दिसतो, त्यानंतर तो संशयित सीसीटीव्हीतून गायब होतो. पोलीस संशयित नंबरही ट्रेस करत आहेत. ते नंबर स्विच ऑफ आहेत. ते ऑन होण्याची वाट पाहत आहेत. बंगळुरू कॅफेमध्ये स्फोट घडवणाऱ्या आरोपीची ओळख पटलेली आहे. ज्याचे वय २८ ते ३० वर्ष असल्याचा अंदाज आहे.
रवा-इडली ऑर्डर दिली पण खाल्ली नाही
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की, आरोपी कॅफेत येतो, काऊंटरवरून कूपन घेतो. त्याने रवा इडलीची ऑर्डर दिली परंतु खाल्ली नाही. ज्या बॅगेत बॉम्ब होता ती बॅग तिथेच ठेऊन तो बाहेर निघाला. स्फोटाच्या संबंधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. संपूर्ण तपास पूर्ण झाल्यावर या घटनेवर भाष्य करू असं मुख्यमंत्री सिद्धारमैया म्हणाले. या स्फोटात आईडीचा वापर करण्यात आला असं लॅबमधून स्पष्ट झाले.
रामेश्वरम कॅफेच्या स्फोटाचा घटनाक्रम
११.३० - संशयित व्यक्ती एक बॅग घेऊन कॅफेत येतो
११.३८ - त्याने कॅश काऊंटरवर जात रवा इडलीची ऑर्डर दिली
११.४४ - त्यानंतर संशयित वॉश बेसिनजवळ गेला
११.४५ - तो कॅफेच्या बाहेर पडला
१२.५६ - कॅफेत स्फोट झाला