८७ लाख, सोन्याचा साठा जप्त; जळगावात RL समूहाकडे पहाटे तीन वाजेपर्यंत तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 06:58 AM2023-08-20T06:58:51+5:302023-08-20T06:59:38+5:30
SBI कडून घेतलेले ५२५ कोटी रुपयांचे थकीत कर्ज प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : जळगावातील आरएल समूहाची ईडीकडून करण्यात आलेल्या तपासणीमध्ये ८७ लाख रुपये जप्त करण्यासोबतच फर्ममध्ये असलेल्या सोन्याचा साठाही जप्त केला आहे. चांदीचा साठा मात्र कायम आहे. पथकातील काही जण शुक्रवारी रात्री १२ वाजता गेले तर अन्य पाच जणांनी मध्यरात्री तीन वाजेपर्यंत कागदपत्रांची तपासणी केली.
आरएल समूहाने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या ५२५ कोटी रुपयांच्या थकीत कर्जप्रकरणी स्टेट बँकेने दिल्ली सीबीआयकडे केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल आहे. त्यानुसार १७ ऑगस्टला सकाळी सहा वाजेपासून सक्त वसुली संचालनालयाच्या २५ अधिकाऱ्यांच्या पथकांकडून तपासणी करण्यास सुरुवात झाली. यामध्ये ‘ईडी’ पथकाने जळगावातील आरएल ज्वेलर्सच्या शोरूमधील ८७ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली व शोरूममधील सोन्याचा स्टॉक देखील सील केला होता. हा साठा जप्त करण्यात आला.
२२ ऑगस्टला हजर राहा
आरएल समूहाचे संचालक माजी खासदार ईश्वरलाल जैन, त्यांच्या पत्नी, माजी आमदार मनीष जैन, त्यांच्या पत्नी अशा चार जणांना समन्स बजावले आहे. त्यापैकी मनीष जैन व त्यांच्या पत्नीला २२ ऑगस्टला नागपूर येथे हजर राहण्याचे सांगण्यात आले. या शिवाय मानराज मोटर्स, नेक्सा शोरूमच्या व्यवस्थापकांनाही नोटीस बजावली आहे.