889 कोटींच्या हेरॉईनप्रकरणी सूत्रधार मोकाट! इराणमार्गे कंटेनरमधून आला अमली पदार्थांचा साठा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 11:48 AM2021-07-05T11:48:38+5:302021-07-05T11:48:55+5:30
उरण - वेश्वी येथील टीजी टर्मिनलमधून हेरॉईनचे जप्त करण्यात आलेले दोन्ही कंटेनर सील करण्यात आले आहेत.
उरण : अफगाणिस्तान - इराणमार्गे भारतात तस्करी मार्गाने जेएनपीटी बंदरातून आयात करण्यात आलेल्या २९० किलो हेरॉईनच्या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे ८८९ कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. वेश्वी - उरण येथील टीजी टर्मिनलमधून गुरुवारी दोन कंटेनरमधून हे अमली पदार्थ ताब्यात घेण्यात आले होते. पण, या प्रकरणामागील मुख्य आरोपी अद्याप मोकाट आहे.
उरण - वेश्वी येथील टीजी टर्मिनलमधून हेरॉईनचे जप्त करण्यात आलेले दोन्ही कंटेनर सील करण्यात आले आहेत. डीआरआय विभागाने सील केलेले दोन्ही कंटेनर संरक्षणात ठेवण्यात आले असून, तिकडे कुणालाही फिरकू दिले जात नसल्याची माहिती टीजी टर्मिनलचे ऑपरेशन मॅनेजर विष्णू नारवाडकर यांनी दिली.
जम्मू - काश्मीरला स्वायत्त दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून अटारी - वाघा चेक पोस्टमार्गे भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे हा मार्ग अमली पदार्थांच्या तस्करीसाठी बंद आहे. डीआरआय विभागाच्या जप्तीच्या कारवाईमुळे हेरॉईनची तस्करी मुंबई आणि जेएनपीटी बंदरातून मोठ्या प्रमाणात सुरू झाली असल्याचे उघडकीस आले आहे. टॅल्कम पावडरच्या नावाखाली आयात करण्यात आलेल्या या तस्करीमागे आंतरराष्ट्रीय माफिया टोळ्यांचा हात असल्याचे सांगितले जात आहे.
या अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे देश नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विणले गेले आहे. त्यामुळे डीआरआय विभागाच्या हाती अनेक प्रकरणात एजंट सोडून काही एक हाती लागले असल्याचे ऐकिवात येत नाही. या प्रकरणातही मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट आहेत. मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.
उरणमधील गोदामे संशयाच्या भोवऱ्यात
उरण परिसरात सध्या अनधिकृत कंटेनर गोदामे मोठ्या प्रमाणात उभारण्यात आली आहेत. सिडको, वन आणि महसूल विभागाच्या वरदहस्ताने उभारण्यात येत असलेल्या अनधिकृत गोदामांचा तस्करीसाठी वापर केला जात असल्याने परिसरातील अनधिकृत गोदामे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.