महिला डॉक्टरला घातला ८.८९ लाखांचा गंडा; ॲन्टॉपहिल पोलिसात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 09:05 AM2024-05-11T09:05:06+5:302024-05-11T09:05:14+5:30
महिलेकडून आठ लाख ८९ हजार रुपये उकळल्याचा प्रकार ॲन्टॉपहिलमध्ये घडला. याप्रकरणी स्काईप आयडीधारक, खातेधारकांविरोधात ॲन्टॉपहिल पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एका महिला डॉक्टरला मुंबई उच्च न्यायालयातून, मुंबई सायबर क्राईम सेलमधून बोलत असल्याची बतावणी करत सायबर ठगांनी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्याची भीती घालून जाळ्यात ओढले. महिलेकडून आठ लाख ८९ हजार रुपये उकळल्याचा प्रकार ॲन्टॉपहिलमध्ये घडला. याप्रकरणी स्काईप आयडीधारक, खातेधारकांविरोधात ॲन्टॉपहिल पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार डॉक्टर यांना ७ मे च्या सकाळी डिस्पेन्सरीमध्ये असताना अनोळखी मोबाईल नंबरवरून कॉल आला. त्या व्यक्तीने तुमच्याविरुद्ध मुंबई सायबर क्राईम ब्रँचमध्ये केस दाखल आहे. तुम्ही सहकार्य केले तर, मी तुम्हाला मदत करतो असे सांगितले. त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून महिला डॉक्टर घाबरली. सायबर क्राईम सेलवरून कॉल येईल असे सांगून फोन ठेवला. काही वेळाने अनोळखी नंबरवरून महिला डॉक्टरला कॉल आला. कॉल करणाऱ्याने सायबर क्राईम सेलमधून इन्स्पेक्टर प्रदीप सावंत बोलत असल्याचे सांगत तुमच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले.
ॲप डाऊनलोड केले अन्...
n तुमच्या आधार कार्डला एकूण २५ बँक खाती लिंक आहेत. या बँक खात्यातून बेकायदेशीर व्यवहार केले जात आहेत. एका खात्यातून २५ लाखांचे बेकायदेशीर व्यवहार झाले असून याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगून प्रकरण मिटविण्यासाठी महिला डॉक्टरला मोबाईलवर स्काईप ॲप डाऊनलोड करुन घेण्यास सांगितले.
n महिला डॉक्टरने ॲप डाऊनलोड करताच त्याने मुंबई सायबर क्राईम डिपार्टमेंट डॉट ३२ डॉट गव्हर्न्मेंट डॉट इन या आयडीवर मेसेज करायला सांगितला. महिला डॉक्टरने तसे करताच त्यांचे ओळखपत्र व अटक वॉरंट पाठवत व्हिडीओ कॉल केला.
n पुढे त्याने वेगवेगळी कारणे सांगून महिला डॉक्टरकडून आठ लाख ८९ हजार ९०५ रुपयांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी सावंत यांना कॉल केला. सावंत नॉट रिचेबल झाला.