विहिरीतून काढले तब्बल ९ मृतदेह; एकाच कुटुंबातील ६ जणांचा समावेश, परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 08:54 AM2020-05-23T08:54:17+5:302020-05-23T08:55:11+5:30
एका कुटुंबातील ६ सदस्य, त्यांचा एक मित्र आणि अन्य २ व्यक्ती असे मिळून एकूण ९ मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
वारंगल – तेलंगणाच्या एका विहिरीत ९ लोकांचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. यातील ६ मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याचं समोर येत आहे. गुरुवारी विहिरीतून ४ लोकांचा मृतदेह सापडल्यानंतर शुक्रवारी पुन्हा ५ जणांचा मृतदेह आढळून आला आहे. प्लास्टिक थैली बनवण्याचं काम करणाऱ्या ४८ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील ३ सदस्यांचे मृतदेह गोरेकुंटा गावातील विहिरीत सापडले.
यानंतर पोलिसांनी आणखी चौकशी केल्यानंतर अन्य मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. राज्यमंत्री इराबेल्ली दयाकर राव यांनी घटनास्थळी भेट देत शोक व्यक्त केला. ज्या ठिकाणी हे मृतदेह ठेवण्यात आले आहेत त्या रुग्णालयालाही मंत्र्यांनी भेट दिली. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. प्रकरणाचा छडा लवकरच लावला जाईल असं ते म्हणाले.
वारंगलचे पोलीस आयुक्त वी रविंद्र यांनी सांगितले की, एका कुटुंबातील ६ सदस्य, त्यांचा एक मित्र आणि अन्य २ व्यक्ती असे मिळून एकूण ९ मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. प्रथमदर्शनी हे प्रकरण आत्महत्येचं वाटत असल्याचं त्यांनी सांगितले. मृतदेहांवर कोणत्याही प्रकारचे निशाण आढळलं नाही. पोस्टमार्टमनंतर मृत्यूचं खरं कारण समजू शकेल. घरच्या प्रमुख व्यक्तीने एका मित्राला घरी बोलवलं होतं. थैली बनवण्याचं काम जास्त आल्याचं मित्राला सांगण्यात आलं होतं.
सध्या पोलिसांकडून या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा नोंद केला आहे. प्रकरणाची चौकशी पुढे सुरु राहील त्यामुळे यात बदल होण्याचीही शक्यता आहे. ४८ वर्षीय व्यक्ती २० वर्षापूर्वी पश्चिम बंगालहून परत आला होता. त्यानंतर तो येथेच वास्तव्य करत होता. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत.