स्वयंचलित छताच्या कामात प्राध्यापकाची नऊ लाखांनी फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 09:27 PM2019-09-16T21:27:49+5:302019-09-16T21:29:13+5:30
फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार : मुंबईतील एका कंपनीच्या संचालकासह दोघांविरुद्ध गुन्हा
अमरावती : स्वयंचलित छत लावण्याचे काम पूर्ण न करणाऱ्या मे. टेक्नोसिस्टिम डोअर ऑटोमेशन इंडिया प्रा.ली. या कंपनीच्या संचालकासह दोघांविरुद्ध सोमवारी फ्रेजरपुरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. सागर शशिकांत शिंदे (३८, रा. नेरूळ, नवी मुंबई) व निखिल पंडित (४१, रा. चिखली, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.
गिरमकर लेआऊट परिसरातील रहिवासी तुषार नरेंद्र गिरमकर यांनी लॉनवर स्वयंचलित छत बांधण्याकरिता मे. टेक्नोसिस्टिम डोअर ऑटोमेशन इंडिया प्रा.ली. कंपनीच्या संचालकाना कोटेशन सादर केले होते. त्यांनी छत ६० दिवसांच्या आत बांधून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार, तुषार यांनी कंपनीच्या नावे विविध तारखेला एकूण ९ लाख ५ हजार रुपये दिले. मात्र, आता एक वर्ष पूर्ण झाल्यावरही कंपनीकडून छताचे काम केवळ ५ टक्केच झाले. याबाबत तुषार यांनी कंपनीच्या संचालकास विचारणा केली असता, ते टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तुषार यांच्या लक्षात येताच त्यांनी सोमवारी फ्रेजरपुरा पोलिसांत याप्रकरणी तक्रार नोंदविली. त्याआधारे पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.