बेकायदा धार्मिक स्थळाने घेतलेल्या बेकायदा वीज पुरवठ्यामुळे घेतला ९ वर्षाच्या बालकाचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 09:37 PM2018-09-28T21:37:02+5:302018-09-28T21:37:23+5:30
पोलीस व पालिकेकडून ५ दिवस झाले तरी कारवाई नाही, नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मीरारोड - गृहसंकुलाच्या आवारात बांधलेल्या अनधिकृत धार्मिकस्थळाला बेकायदा वीज पुरवठा करणे त्याच संकुलातील ९ वर्षाच्या चिमुरड्याच्या जीवावर बेतले. पण या हलगर्जीपणाच्या घटनेला ५ दिवस उलटले तरी महापालिका व पोलीसांकडून कारवाई होत नसल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. तर नवघर पोलीस ठाण्याच्या सुत्रांनी मात्र मृत्युस कारणीभुत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे म्हटले आहे.
मीरारोडच्या रामदेव पार्क मार्गावर कॅनवूड पार्क नावाचे गृहसंकुल आहे. या संकुलाच्या आवारात रहिवाशांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने धार्मिकस्थळ बांधले आहे. परंतु सदर धार्मिक स्थळ बांधताना महापालिकेची तसेच पोलीस आदी यंत्रणांची परवानगी घेण्यात आलेली नाही. शिवाय शासन तसेच उच्च न्यायालयाने देखील बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिकांना सतत देऊन देखील पालिकेने त्याकडे सोयीस्कर डोळेझाक चालवली. या बेकायदा धार्मिक स्थळात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आली होती. धार्मिकस्थळाला वीज पुरवठा करण्यासाठी गृहसंकुलाच्याच वीज मीटर मधुन वीज जोडणी घेण्यात आली. त्यासाठी मध्ये लोखंडी खांब टाकुन त्यावरुन वीज वाहक वायर टाकण्यासह हॅलोजन लावण्यात आला होता. रविवारी रात्री ८ च्या सुमारास याच संकुलातील आर्यन अशोक आला (वय ९) हा मुलगा तेथे खेळत असताना लोखंडी खांबास स्पर्श होताच त्याला वीजेचा जबर धक्का बसला. त्याला सृष्टी भागातील रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण त्याचा आधीच मृत्यु झाला होता. या ९ वर्षाच्या चिमुरड्याच्या मृत्युने हळहळ व्यक्त होत असतानाच बेकायदा वीज जोडणी व झालेल्या हलगर्जीपणाबद्दल सुध्दा संताप व्यक्त होत आहे.