डॉक्टरचा 'लव्ह जिहाद'! इकबाल बनला राजू, निशाशी केलं दुसरं लग्न, त्यानंतर हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 09:23 AM2023-05-10T09:23:22+5:302023-05-10T09:23:43+5:30
बरेलीत दवाखाना असणाऱ्या आरोपी डॉक्टर इकबाल अहमदने २०१२ मध्ये सहारनपूर इथं राहणाऱ्या निशा देवीशी लग्न केले होते.
बरेली - उत्तर प्रदेशातील बरेली कोर्टात ९ वर्षीय मुलीने साक्ष दिली आणि न्यायाधीशांनी आरोपी बापाला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. आईच्या हत्येसाठी मुलीने वडिलांना दोषी ठरवले. हे प्रकरण २०२१ चं आहे. डॉक्टर बापाने २ मित्रांच्या मदतीने आईची हत्या केली. कोर्टाने आरोपी डॉक्टरला शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली.
बरेलीत दवाखाना असणाऱ्या आरोपी डॉक्टर इकबाल अहमदने २०१२ मध्ये सहारनपूर इथं राहणाऱ्या निशा देवीशी लग्न केले होते. त्यांना २ मुली आहेत. २६ ऑक्टोबर २०२१ रोजी निशाचा मृतदेह घरात सापडला. त्याठिकाणाहून डॉक्टर गायब झाला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवले. निशाची आई कौशलदेवीला अल्पवयीन नातीने आईला वडिलांनी मारल्याचे सांगितले. निशाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले.
इकबालने नाव बदलून केले होते प्रेम
माहितीनुसार, सरकारी वकील सचिन जायसवाल यांनी कोर्टात सांगितले की, निशा आणि इकबालचे लव्ह मॅरेज झाले होते. इकबालने डॉ. राजू शर्मा नाव सांगून निशासोबत ओळख वाढवली. हिंदू परंपरेनुसार त्या दोघांनी लग्न केले. दोघे सहारनपूर इथं राहायचे. निशाला तिच्या पतीचे रहस्य जेव्हा ते बरेलीच्या मीरगंज येथे आले तेव्हा कळाले. राजू हे खोटे नाव असून तो इकबाल आहे आणि त्याचे आधीच लग्न झाले होते. त्यानंतर आरोपी इकबालने निशावर दबाव टाकला. तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. परंतु निशाला त्याच्या खोटेपणाचा राग आला होता. त्यामुळे ती काहीही ऐकण्यास तयार नव्हती. तेव्हा डॉक्टरने तिची हत्या केली.
आरोपी इकबालवर कलम ३०२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २८ ऑक्टोबर २०२१ रोजी बेकायदेशीर धर्मांतर अधिनियमाखाली FIR नोंदवण्यात आला. त्यानंतर आरोपी इकबालला ३ महिन्यांनी अटक करण्यात आली. तपासात निशाची हत्या सहकारी मोहम्मद यासीन आणि मिसरियार खानच्या मदतीने केल्याचे उघड झाले. एप्रिल २०२२ रोजी ३ आरोपींविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली. कोर्टात या प्रकरणाच्या सुनावणीवेळी ९ वर्षीय मुलगी जी सध्या तिसरीत शिकते. तिच्या साक्षीवरून आरोपी इकबालला दोषी ठरवण्यात आले. या मुलीने कोर्टाला सांगितले की, माझी आई टीव्ही बघत होती, तेव्हा वडील आणि अन्य दोघे जण यांनी तिला मारून टाकले. कोर्टाने मुलीच्या साक्षीवरून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.