वाशीतून ८९ किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:27 PM2019-12-16T23:27:25+5:302019-12-16T23:27:28+5:30

एकाला अटक : उपआयुक्तांच्या पथकाने केली कारवाई

90 kg of marijuana seized from Vashi | वाशीतून ८९ किलो गांजा जप्त

वाशीतून ८९ किलो गांजा जप्त

Next

नवी मुंबई : गांजाची साठवणूक करण्यात आलेल्या गोदामावर पोलिसांनी छापा टाकून ८९ किलो गांजा जप्त केला आहे. वाशी गावातील निवासी इमारतीमध्ये भाडोत्री घरात हा साठा करण्यात आला होता. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून तो गोवंडीचा राहणारा आहे.
मोहम्मद इम्रान सादिक अली शहा (२३) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. टेंपो चालक असल्याचे भासवून तो नवी मुंबई परिसरातील छोट्या मोठ्या गांजा विक्रेत्यांना गांजाचा पुरवठा करायचा. याकरिता तो स्वत:च्या टेंपोचा वापर करत होता. टेंपोतून मालवाहतुकीच्या आडून ठरलेल्या ठिकाणी तो गांजा पुरवायचा. रविवारी संध्याकाळी तो वाशी गावात येणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरिक्षक जी. डी. देवडे यांना मिळाली होती. त्यानुसार देवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्चना कारखिले, संजय ठाकूर, विनायक गायकवाड आदीच्या पथकाने रात्री वाशी गाव परिसरात सापळा रचला. यावेळी मोहम्मद शहा त्याठिकाणी आला असता, पोलीसांना त्याच्या हालचालीवर संशय आला. त्याच्याकडील सामानाची झडती घेतली असता त्यामध्ये एक किलो गांजा आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता वाशी गावात भाड्याने घर घेवून तो राहत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला असता घरामध्ये ८८ किलो २५० ग्रॅम गांजाचा साठा आढळून आला. मोहम्मद हा गुन्हेगारी पार्श्वभुमीचा असून त्याने आठ महिन्यांपूर्वी वाशी गावातील ओम साई निवास या चार मजली इमारतीच्या तळमजल्यावरील घर भाड्याने घेतले होते. या घराचा वापर तो गांजाचे गोदाम म्हणुन करत होता. त्याच्याकडे आढळून आलेला एकूण ८९ किलो २५० ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
बाजारभावानुसार त्याची किंमत १० लाख ७६ हजार २५० रुपये इतकी आहे. तो कोणाकडून गांजा खरेदी करायचा, याची माहिती त्याने अद्याप पोलिसांना दिलेली नाही. मात्र नवी मुंबई परिसरातील छोट्या मोठ्या गांजा विक्रेत्यांना तो गांजाचा पुरवठा करत होता, अशी कबुली त्याने दिली आहे. मालवाहतूक करणारा टेंपो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. चौकशीत शहरातील सर्व गांजा विक्रेत्यांच्या अड्डयांची माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
अटक करण्यात आलेला मोहम्मद शहा हा गोवंडीचा राहणारा असून त्याने वाशी गावात देखिल भाड्याने घर घेतले होते. त्याचा वापर तो केवळ गांजाचा साठा करण्यासाठी करत होता. दरम्यान घर भाड्याने घेण्यासाठी त्याने जागा मालकासोबत भाडेकरार केला असून त्यास पोलीसांचे ना हरकत प्रमाणपत्र देखिल देण्यात आले होते. त्यानुसार मागील आठ महिन्यांपासून तो त्याठिकाणावरुन शहरात गांजाचा पुरवठा करत होता. अखेर परिमंडळ उपआयुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवडे यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकून कारवाई केली. उपआयुक्तांच्या या विशेष पथकाने मागिल काही महिन्यात गांजा विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करुन संबंधीतांवर एन.डी.पी.एस. अंतर्गत ५१ गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी ९० हुन अधिक गुन्हेगारांना आजवर अटक करण्यात आली आहे.
शहरातील अनधिकृत झोपड्यामधून तसेच व्यवसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांमार्फत गांजासह इतर अमली पदार्थ विक्रीचे जाळे पसरवले जात आहे. त्याविरोधात पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या सुचनेनुसार परिमंडळ एक मध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विरोधी कारवार्इंचा धडाका सुरु आहे. परंतु मुख्य पुरवठादार हाती लागत नसल्याने हे रॅकट मोडीत काढण्यात पोलिसांना पुरेसे यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र वाशी गावातील गोडाऊनवर छापा टाकून ८९ किलो गांजा जप्त केल्याने काही प्रमाणात गांजा विक्रेत्यांच्या अड्डयांना आळा बसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: 90 kg of marijuana seized from Vashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.