बचत गटाच्या संचालकांकडून महिलांची ९१ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 04:43 PM2019-05-11T16:43:25+5:302019-05-11T16:47:00+5:30
ठेवी म्हणून जमा झालेल्या रक्कमेची मुदतपूर्ती झाल्यानंतरही त्यांनी ठरल्याप्रमाणे मुद्दल, व्याज, लाभांश व फायदा दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महिलांना परत केली नाही़.
पुणे : महिला बचत गटाची स्थापना करुन त्यांना शिवजीत मुद्रा क्रेडिट सोसायटीचे शेअर महिलांना घेण्यास भाग पाडून त्याची मुदत संपल्यानंतरही लाभांश, व्याज न देता महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी श्री महालक्ष्मी नारायण महिला महासंघाच्या संचालकांसह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे़. चंदननगर पोलिसांकडे आतापर्यंत ९१ लाख ५१ जार ५४६ रुपयांच्या तक्रारी आल्या आहेत़.
श्री महालक्ष्मी नारायण महिला महासंघाचे संस्थापक शिवाजी तुकाराम ढमढेरे, सविता विजय थोरात, विजय थोरात, अंजली थोरात (सर्व रा़. ममता सोसायटी एरिया, ज्युपिटर कॉम्प्लेक्स, वडगाव शेरी) इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
याप्रकरणी मिना मोहन इंगळे (वय ४४, रा़. माळवाडी, वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे़ हा प्रकार १० डिसेंबर २०१५ पासून आतापर्यंत वडगाव शेरी येथे घडला आहे़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, शिवाजी ढमढेरे हे श्री महालक्ष्मी नारायण महिला महासंघाचे संस्थापक आहेत़. त्यांनी व थोरात आणि शिवजीत मुद्रा मल्टीस्टे क्रेडिट को -ऑप सोसायटीचे संचालक मंडळ यांनी श्री महालक्ष्मी नारायण महिला महासंघाद्वारे महिला बचत गट सुरु केला़ महिलांना त्यांनी बचत गटाद्वारे जमा झालेली रक्कम ठेवी म्हणून सोसायटीत ठेवायला सांगितली़. महासंघाद्वारे सुरु केलेल्या विविध उपक्रमांसाठी पैसे जमा करुन घेतले़.शिवजीत मुद्रा क्रेडिट सोसायटी बँकेचे ११ हजार रुपयांचे शेअर महिलांना खरेदी करायला सांगितले़. त्यांनी खरेदी केल्यानंतर ठेवी म्हणून जमा झालेल्या रक्कमेची मुदतपूर्ती झाल्यानंतरही त्यांनी ठरल्याप्रमाणे मुद्दल, व्याज, लाभांश व फायदा दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महिलांना परत केली नाही़. तसेच बचत गट सुरु केल्यानंतर त्याद्वारे कोणाला काही एक वस्तू अगर काम न देता महिलांची फसवणूक केली़. या महिलांनी पैशांची मागणी केल्यावर त्यांनी देण्यास टाळाटाळ केल्याने शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे़. मिना इंगळे यांची ११ हजार रुपयांची व इतर महिलांची असे मिळून आतापर्यंत ९१ लाख ५१ हजार ५४६ रुपयांच्या तक्रारी आल्या असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे़. पोलीस उपनिरीक्षक पी़ व्ही़ कुलकर्णी अधिक तपास करीत आहेत़.