बिल मंजुरीसाठी स्वीकारले ९२ हजार; कार्यकारी अभियंता सतीश लब्बा लाचलुचपतच्या जाळ्यात
By दत्ता यादव | Published: August 2, 2022 09:07 PM2022-08-02T21:07:49+5:302022-08-02T21:08:43+5:30
Bribe Case : याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार हे ठेकेदार असून, त्यांनी सिमेंट काँक्रीट बंधाऱ्याचे काम पूर्ण केले होते.
सातारा : सिमेंट काँक्रीट बंधाऱ्याचे केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ९२ हजारांची लाच घेताना मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश पंचाप्पा लब्बा (वय ४८, रा. सध्या रा. सदर बझार सातारा, मूळ रा. सिद्धेश्वर पेठ, सोलापूर) यांना लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार हे ठेकेदार असून, त्यांनी सिमेंट काँक्रीट बंधाऱ्याचे काम पूर्ण केले होते. त्याचे बिल काढण्यासाठी कृष्णानगर येथील मृद व जलसंधारण विभागात ते गेले होते. त्यावेळी कार्यकारी अभियंता सतीश लब्बा यांनी तक्रारदाराला कामाचे बिल मंजूर करून ते बिल वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी २ टक्के प्रमाणे लाच मागितली. त्यामुळे संबंधित तक्रारदार ठेकेदाराने लाचलुचपत विभागाकडे रितसर लेखी तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा केली असता कार्यकारी अभियंता लब्बा हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी दुपारी जलसंधारण विभागात लब्बा यांना ९२ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
कार्यकारी अभियंताच लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याचे समजताच जलसंधारण विभागात खळबळ उडाली. लब्बाला ताब्यात घेऊन अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात नेले. या ठिकाणी लब्बांची दोन तास कसून चाैकशी करण्यात आली. ते राहात असलेल्या फ्लॅटमध्ये तसेच सोलापुरातील राहत्या घरातही अधिकाऱ्यांनी एकाचवेळी झाडाझडती घेतली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस नाईक विनोद राजे, संभाजी काटकर, निलेश येवले, तुषार भोसले यांनी केली.
‘लोकमत’मुळे कारभार चव्हाट्यावर
मृद व जलसंधारण विभागाकडून बांधण्यात आलेल्या अनेक सिमेंटच्या बंधाऱ्याचे काम निकृष्ट असल्याचे ‘लोकमत’ने काही दिवसांपूर्वीच वृत्तमालिकेच्या माध्यमातून समोर आणले होते. बंधारे न बांधताच कोट्यवधी रुपये लाटण्यात आले होते. या वृत्त मालिकेनंतर जलसंधारण कार्यालयातील अनागोंधी कारभार चव्हाट्यावर आला होता. आता तर या विभागाचा गाडा हाकणारा कार्यकारी अभियंताच लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने ‘लोकमत’ने मांडलेले वास्तव समोर आले आहे.