दहावीतील मुलाने नववीतील मुलाकडून उकळले १० लाख; दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 10:26 AM2023-07-12T10:26:28+5:302023-07-12T10:26:51+5:30
आईने लॉकरमध्ये ठेवले होते अकरा लाख
सोलापूर : शिक्षिका असलेल्या आईला त्यांच्या वडिलांनी निवृत्तीच्या रकमेपैकी पाच लाख रुपये दिले. आईने त्यात भर घालून लॉकरमध्ये ११ लाख २५ हजार रुपये ठेवले. मात्र, त्यांच्या नववीत शिकणाऱ्या मुलाला त्याच्या दहावीतील मित्राने ठार मारण्याची धमकी देत टप्प्याटप्प्याने १० लाख रुपये उकळले. याप्रकरणी दहावीतील मुलासह एका नातेवाइकावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी सिडगिद्दी यांचा कारखाना आहे. त्या खासगी शाळेत शिक्षिका आहेत. त्यांचा मुलगा शहरातील नावाजलेल्या शाळेत नववीचे शिक्षण घेत आहे. त्याची मैत्री त्याच शाळेतील दहावीतील मुलाशी झाली. फिर्यादीच्या मुलाने कपाटातील पैसे मित्रासोबत खर्च केले. याप्रकरणी दहावीतील एक मुलगा व नातेवाईक आकाश खेड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
काय झाले समजून घेऊ !
आरोपीने नववीतील मुलाला उसने घेतलेले पाचशे रुपये दिले नाहीत. आरोपीने पुन्हा पैसे मागताच नववीतील मुलाने नकार दिला.
पुढे ठार मारण्याची धमकी देत आरोपीने पैसे मागितले. घाबरलेल्या नववीतील मुलाने आधी पाच हजार रुपये दिले. पुढे आरोपी धमक्या देत गेला अन् मुलगा पैसे देत गेला. दहावीच्या मुलाने असे ८ लाख रुपये उकळले. नातेवाइकाने घेतले २ लाख दहावीतील मुलाने पैसे घेतल्याचा प्रकार त्याच्या नातेवाइकाला सांगितला. नातेवाइकानेही मुलाला धमकावत २ लाख रुपये घेतले. सहा महिन्यांनंतर घटना उघडकीस कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली रक्कम डिसेंबर २०२२ मध्ये मोजली होती. चावी कपाटातच ठेवलेली होती. त्यानंतर पैसे मोजल्यानंतर कपाटात फक्त एक लाख रुपये होते.