वरातीत नाचता नाचता १४ वर्षीय मुलगा अचानक गायब; वडिलांना पहाटे मिळाला बंद लिफाफा, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 20:01 IST2025-03-16T20:00:55+5:302025-03-16T20:01:43+5:30
अनिकेत रात्री मिरवणुकीतून गायब झाल्यानंतर पहाटे त्याच्या घरासमोर वडिलांच्या नावाने एक बंद लिफाफा आढळून आला.

वरातीत नाचता नाचता १४ वर्षीय मुलगा अचानक गायब; वडिलांना पहाटे मिळाला बंद लिफाफा, मग...
वाशिम - लग्नाच्या वरातीत डिजेच्या तालावर नाचत असताना १४ वर्षीय अनिकेत संतोष सादुडे या मुलाचं अपहरण झाल्याची थरारक घटना वाशिमच्या बाभूळगाव इथं घडली आहे. गेल्या ४ दिवसांपासून पोलीस अनिकेतचा शोध घेत आहेत मात्र अद्याप त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. या घटनेमुळे गावात दहशतीचं वातवरण निर्माण झालं असून यंदा गावकऱ्यांनी होळी आणि धूलिवंदनाचा सण साजरा केला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बाभूळगाव येथे १२ मार्च रोजी नानमुखाचा कार्यक्रम आयोजित केला होता. गावातून वरात काढण्यात आली होती. ज्यात डिजेच्या तालावर मोठ्या जल्लोषात नाचण्याचा आनंद घेतला जात होता. अनिकेतही या मिरवणुकीत सहभागी होता. मात्र काही वेळातच तो अचानक गायब झाल्याचं लक्षात आलं. चौकशीत ६० लाख रूपयांच्या खंडणीसाठी तसेच सोने चांदीच्या दागिन्यांसाठी त्याचे अपहरण झाल्याचे उघड झाले. पोलिसांकडून कसून तपास सुरू असून अजूनही काही धागेदोरे हाती लागले नाहीत.
कसा घडला घटनाक्रम?
१२ मार्च रोजी रात्री १० वाजता अनिकेत गावातील नानामुखाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी घराबाहेर गेला. मध्यरात्रीपर्यंत तो घरी परतला नाही. त्यावेळी कुटुंबियांनी शोध घेतला परंतु तो सापडला नाही. १३ जानेवारीच्या पहाटे वडिलांना घरासमोर एक बंद लिफाफा मिळाला. त्यामध्ये ६० लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचे दिसून आले. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला त्यासाठी ३ पथके तयार करण्यात आली.
जुन्या आययूडीपी कॉलनीत लोकेशन
तपासादरम्यान पोलिसांना वाशिम येथील जुन्या आययूडीपी कॉलनीतील एका लोखंडी जिन्याच्या घरात अनिकेतला ठेवल्याचे लोकेशन मिळाले. त्यावरून पोलिसांच्या विशेष पथकाने संपूर्ण कॉलनीत शोध घेतला परंतु त्याचा काही फायदा झाला नाही.
५ पानांचे पत्र आणि ६० लाखांची मागणी
अनिकेत रात्री मिरवणुकीतून गायब झाल्यानंतर पहाटे त्याच्या घरासमोर वडिलांच्या नावाने एक बंद लिफाफा आढळून आला. तो उघडून पाहिल्यावर त्यात संगणकावर टाइप केलेले ५ पानी पत्र आढळले. पत्रात खंडणीखोरांनी ६० लाख रूपये आणि घरातील सोन्याचे दागिने ठराविक ठिकाणी आणून द्यावेत त्यानंतर मुलाला परत दिले जाईल असा इशारा दिला. तसेच पोलिसांशी संपर्क साधल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही देण्यात आली. या प्रकरणी अनसिंग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यावरून पोलिसांनी बीएनएसमधील कलम १४० (२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.