मित्राला भेटायला बिहारहून मुंबई गाठली, दुष्टचक्रात अडकली; ५ दिवस मुलीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 06:02 AM2023-09-19T06:02:27+5:302023-09-19T06:03:06+5:30
पाच दिवसांनी मुलीची सुटका झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी जसिम मन्नन शेख (२६) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याचा मित्र फलातु ऊर्फ रेहमान शेख (१९) याचा शोध सुरू आहे.
मुंबई - मित्राला भेटण्यासाठी १६ वर्षीय मुलीने बिहारहून मुंबई गाठली. मित्राकडे राहण्याची व्यवस्था नसल्याने ती दादर स्थानकात मित्राची वाट बघत असतानाच, एका विकृताची नजर तिच्यावर पडली. त्याने मुलीला जबरदस्तीने दादर येथून टॅक्सीने वांद्रे परिसरातील त्याच्या घरात डांबून मित्राच्या मदतीने मुलीवर वांरवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पाच दिवसांनी मुलीची सुटका झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी जसिम मन्नन शेख (२६) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याचा मित्र फलातु ऊर्फ रेहमान शेख (१९) याचा शोध सुरू आहे. मूळची बिहारची रहिवासी असलेली १६ वर्षीय मुलगी विशाल नावाच्या मित्राला भेटण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी मुंबईत आली. मित्राकडे राहण्याची व्यवस्था नसल्याने ती दादर रेल्वे स्थानकातच विशालची वाटत पाहत बसली असताना, जसीम हा तेथे आला. त्याने, मुलीला जबरदस्तीने टॅक्सीमध्ये बसवून दादर येथून वांद्रे येथे त्याच्या घरी आणले.
तिला घरात डांबून, तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एका व्यक्तीला घराबाहेर ठेवले. त्यानंतर वेळोवेळी आरोपीने आणि त्याच्या मित्राने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. ११ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान मुलीवर अत्याचार सुरू होते. अखेर तेथून बाहेर पडण्यास यश मिळताच तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदविला असून, अधिक तपास सुरू आहे.