नाशिकच्या मध्यवर्ती भागात १३ लाखांची २५ किलो चांदीचे पार्सल लुटले
By अझहर शेख | Published: August 22, 2022 08:01 PM2022-08-22T20:01:06+5:302022-08-22T20:01:23+5:30
दोन दुचाकींवरून पाच संशयित लुटारुंनी त्यांना अडविले. शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करण्यास सुरूवात केली.
अझहर शेख
नाशिक : शहरासह जळगावातील काही सराफांकडून घेतलेली चांदी पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद येथे पाठविण्यासाठी रविवारी (दि.२१) रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास खासगी कुरियर सर्व्हिसेसचे नोकरदार दुचाकीने नवीन मध्यवर्ती बसस्थानकाकडे जात होते. यावेळी दोन दुचाकींवरुन आलेल्या पाच लूटारूंनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करत गळ्यात अडकविलेली बॅग व ॲक्टीवा दुचाकी घेऊन धूम ठोकल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल कण्यात आला आहे.
सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेळा बसस्थानकापासून नवीन मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास दुचाकीस्वारांनी अडवून फिर्यादी अमितसिंग धनसिंग सिकरवार (२४,रा.फावडे लेन, मेनरोड, मुळ उत्तरप्रदेश) हा त्याच्या दोन साथीदारांसोबत दुचाकीने विविध सराफांकडून घेतलेल्या चांदीचे पार्सल अन्य शहरात पोहचविण्यासाठी बसस्थानकाकडे जात होते.
यावेळी फिर्यादीसोबत त्याचे मित्र राज शर्मा, विष्णुकुमार सिसोदिया हेदेखील होते. दोन दुचाकींवरून पाच संशयित लुटारुंनी त्यांना अडविले. शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी घाबरून शर्मा व सिसोदिया यांनी पळ काढला; मात्र फिर्यादी अमितसिंग याला लुटारूंनी खाली पाडून त्याच्या गळ्यातील बॅग व ॲक्टिवा दुचाकी (एम.एच१२ टीएफ.७५१२) घेऊन पाचही संशयित फरार झाले, असे त्याने फिर्यादीत म्हटले आहे. या जबरी लुटीच्या घटनेत संशयितांनी तब्बल १२ लाख ७५ हजार रुपये किंमतीची एकुण २५किलो ५२३ग्रॅम इतकी चांदी लांबविली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निवसासस्थानांजवळ ही लूट झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी जबरी लूट, हत्यार कायदा, व मारहाणप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.