"मला छळलंय, त्यासाठी जीव देतोय" पतीनं नदीत उडी मारली; बायकोला अखेरचा म्हणाला..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 04:22 PM2023-04-03T16:22:26+5:302023-04-03T16:23:18+5:30
राहुलने काही लोकांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्याकडून दबाव येत असल्याचं म्हटलं.
लखनौ - शहरातील समतामूलक चौकात शनिवारी रात्री गांधी सेतू पुलावरून नदीत उडी मारण्याआधी राहुल आर्याने फेसबुक लाईव्ह केले होते. त्यात राहुलने अनेक लोकांवर छळल्याचा आरोप करत आत्महत्येसाठी त्यांना जबाबदार धरले. राहुल आर्याच्या घरातून एक सुसाईड नोटही पोलिसांनी सापडली. त्याआधारे आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सुसाईड नोट, लाईव्ह व्हिडिओ आणि पत्नीच्या तक्रारीनंतर आता पोलिसांनी पाच पानी गुन्हा नोंद केला आहे. रविवारी अनेक तास एसडीआरएफ टीम राहुलचा शोध घेत होती. परंतु रात्री उशीरापर्यंत राहुलचा काहीच थांगपत्ता लागला नाही. याबाबत पोलीस निरिक्षक दिनेश चंद्रा म्हणाले की, राहुल आर्या हजरतगंजच्या प्लास कॉलनीत राहतो. तो खासगी संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करतो. शनिवारी रात्री राहुलने गोमती इथं उडी घेतली. मात्र त्याआधी त्याने फेसबुकवर लाईव्ह केले होते.
यात राहुलने काही लोकांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्याकडून दबाव येत असल्याचं म्हटलं. छळाला कंटाळून राहुलने आत्महत्या केली. हा व्हिडिओ पाहून कुटुंबही अवाक् झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, ८ वर्षापूर्वी राहुलचा ज्यांच्याशी वाद झाला होता त्याचे नाव त्याने आत्महत्या करण्यापूर्वी घेतले होते. सुसाईड नोटमध्येही ती नावे आहेत. राहुलची पत्नी संजना तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी टोनी सिक्का, सुजीत वर्मा, रितिका, राधा आणि नेहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
पत्नीला सांगितलं, थोड्याच वेळात येतो...
संजनाने सांगितले की, शनिवारी रात्री ९ च्या सुमारास राहुलसोबत घरी परतले होते. घरी आल्यानंतर राहुल थोड्याच वेळात येतो सांगून घराबाहेर पडला. मी साडे अकराच्या सुमारास मोबाईल पाहिला तेव्हा राहुलचा फेसबुकवरचा लाईव्ह व्हिडिओ पाहून धक्का बसला. मी तातडीने घरच्यांना या व्हिडिओची माहिती दिली. त्यानंतर राहुलला कॉल लावला तो एका पोलिसाने उचलला. त्यांनी गांधी सेतू पुलावर यायला म्हटलं. त्याठिकाणी पोहचल्यावर राहुलने नदीत उडी मारल्याचं कळालं. शिवनगरच्या मुलांसोबत राहुलचा वाद झाला होता. त्यात सुजीत वर्मा उर्फ कुक्कूच्या कुटुंबाने मदत केली होती. या लोकांनी राहुलविरोधातच खोटे गुन्हे दाखल केले. हे प्रकरण काही काळानंतर बंद झाले होते असं पत्नी संजनाने म्हटलं.