घरापासून काही अंतरावर ५ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; नागपड्यातील घटनेनं परिसर सुन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 06:29 AM2023-01-09T06:29:08+5:302023-01-09T06:29:23+5:30
नागपाडा परिसरात ५ वर्षीय मुलगी शनिवारी रात्री घरापासून काही अंतरावर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करत पळ काढला.
मुंबई : नागपाडासारख्या संवेदनशील ठिकाणी ५ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मुलगी मानसिक धक्क्यात असल्याने तिच्याकडून आरोपीबाबत कुठलीही माहिती मिळाली नसताना नागपाडा पोलिसांच्या स्पेशल ३५ जणांच्या टीमने अवघ्या सहा तासांत आरोपीला नालासोपारा येथून पकडले आहे.
नागपाडा परिसरात ५ वर्षीय मुलगी शनिवारी रात्री घरापासून काही अंतरावर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करत पळ काढला. मुलीने त्याच्या तावडीतून सुटका होताच त्रास होत असल्याचे सांगितले. आईने मुलीला तत्काळ नायर रुग्णालयात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ नागपाडा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली नागपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेशकुमार ठाकूर स्वतः ऑन फिल्ड उतरले.
३५ जणांच्या ५ टीम तयार करत नागपाडासह मुंबईचा कोनाकोपरा पिंजून काढला. पहाटेच्या सुमारास एका सीसीटीव्हीमध्ये एका तरुणाचा पुसटसा चेहरा पथकाच्या हाती लागला. पुढे हाच धागा पकडून पोलिस त्याच्या मामापर्यंत पोहोचले. मामाकडून त्याच्या घराचा पत्ता मिळाला. तेथून तो नालासोपारा येथे असल्याचे समजताच पोलिसांनी तेथे धाव घेतली व सलग सहा तास सुरू असलेल्या मेहनतीला यश आले.