घरच्यांना न सांगता लिव्ह इनमध्ये राहत होता बँक ऑफिसर; मृत्यूनंतर घरवाले पोहोचताच पोलीस चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 02:22 PM2023-01-25T14:22:40+5:302023-01-25T14:22:58+5:30
चक्रावलेल्या पोलिसांनी दोघांनाही शांत करत एक प्रस्ताव ठेवला. त्या महिलेच्या दाव्यानुसार ९ वर्षांची मुलगी हितेशपासून झालेली होती.
उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये पती-पत्नीच्या नात्याचे एव विचित्र प्रकरण समोर आले आहे. दिल्लीच्या एका महिलेने बँकेच्या मृत फिल्ड ऑफिसर आपला पती असल्याचा दावा केला आहे. त्याच्यापासून तिला नऊ वर्षांची मुलगीही आहे. तर घरच्यांनी तो अविवाहित असल्याचे म्हटल्याने पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
बँक ऑफ बडोदाच्या जैतीपूर शाखेत फिल्ड ऑफिसर हितेश कुमार (३४) याचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला होता. यानंतर त्याचा मृतदेह घेण्यासाठी हितेशचे कुटुंबीय आले होते. तेवढ्यात एका मुलीला घेऊन तिथे महिला देखील पोहोचली होती. दोघांनीही त्याचे कुटुंब असल्याचा दावा केला होता. परंतू दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. तिला सून म्हणून स्वीकारण्यास हितेशचे घरवाले तयार नव्हते. यामुळे तिथे जोरदार खडाजंगी उडाली होती.
यामुळे चक्रावलेल्या पोलिसांनी दोघांनाही शांत करत एक प्रस्ताव ठेवला. त्या महिलेच्या दाव्यानुसार ९ वर्षांची मुलगी हितेशपासून झालेली होती. असे असेल तर तिचा डीएनए हितेशच्या डीएनएसोबत जुळतो का ते पाहू. यावर हितेशच्या घरवाले देखील राजी झाले. जर डीएनए जुळला तरच आम्ही त्यांना स्वीकारू असे ते म्हणाले आहेत. पोलिसांनी हुशारी दाखवून मृतदेहाचे देखील डीएनए सॅम्पल घेऊन ठेवले आहे.
उद्या यांचे प्रकरण कोर्टात गेले तर तपास करता यावा यासाठी पोलिसांनी ही सोय करून ठेवली आहे. घरवाल्यांनी सांगितले की, हितेशचे अद्याप लग्न झालेले नाहीय. तर महिलेने सांगितले की, हितेशने लग्न केल्यानंतर तिला दिल्लीत ठेवले होते. त्यांना नऊ वर्षांची मुलगीही आहे. या महिलेचे नाव मायदेवी आहे.
माया देवी यांनी सांगितले की, त्यांनी हरिद्वारमध्ये फील्ड ऑफिसर हितेशला पहिल्यांदा भेटली होती. प्रेमप्रकरणामुळे डेहराडूनमध्ये पोस्टिंग झाल्यानंतर हितेश तिच्या संपर्कात होता. यानंतर दोघांनी लग्न केले. मायाने सांगितले की, हितेश शनिवारी आणि रविवारी तिच्याकडे येऊन राहायचा. तो त्यांच्यासोबत सुट्ट्याही घालवत असे, पण त्यांना त्यांच्या घरातील सदस्यांसमोर कधीही येऊ दिले नव्हते. माया आणि हितेश हे लिव्ह इनमध्ये राहत होते, परंतू लग्न केल्याचा पुरावा तिच्याकडे नाहीय. यामुळे मुलीचा डीएनए जुळणेच त्यांच्यासाठी महत्वाचे आहे.