प्रेयसीसाठी घरापुढे लावला बॉम्ब; वर्धेतील घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 07:17 AM2024-02-29T07:17:39+5:302024-02-29T07:17:53+5:30
परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी (जि. वर्धा) : येथील विठ्ठल वॉर्डातील एका घरासमोरील फाटकाला बॉम्बसदृश वस्तू अडकविल्याचे दिसून आल्याने पहाटेपासून परिसरात दहशत होती. संबंधित वस्तूच्या वायर कापून पोलिसांनी ती निकामी केली व दुर्घटना टळली. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले.
येथील वंदना ज्ञानेश्वर कारमोरे (५७) यांच्या घराबाहेरील फाटकाला बॉम्बसदृश वस्तूची पिशवी अडकविल्याचे दिसले. साफसफाईला उठलेल्या अनुप चोपकर हिला हा प्रकार दिसला. तिने आजी वंदना यांना सांगितले. पिशवीत बॅटरी व टायमर अशी बॉम्बसदृश वस्तू होती. एक आत आणि एक बाहेर अशा दोन चिठ्ठ्या होत्या. एका चिठ्ठीत ‘हात लावू नका, अन्यथा मोठा स्फोट होईल’, असे लिहिले होते. पिशवीतील बॉम्बसदृश वस्तूला टायमर होते. त्यावर ७:२९ अशी वेळ होती. त्याला लागूनच बॅटरीही होती. त्यामध्ये विविध रसायनांचे मिश्रण, तसेच आगडबीतील काड्यांवरील गुलाचा वापर केल्याचे दिसून आले.
घरातील मुलाचा साखरपुडा...
ज्ञानेश्वर कारमोरे यांचा मुलगा नवोदय विद्यालय अमरावती येथे प्राध्यापक आहे. त्याचा साखरपुडा एका मुलीशी झाला.
त्यामुळे या घटनेला प्रेम प्रकरणाची किनार असल्याचे पोलिस सांगतात. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटणकर यांनी साखरपुडा झालेल्या मुलासह त्याच्या कुटुंबाची चौकशी करून माहिती घेतली आहे.