कम्प्युटर, महागडा मोबाईल घेण्यासाठी अल्पवयीन मुलानं तयार केला बॉम्ब; टायमरनंही उडवला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 07:07 AM2022-07-16T07:07:10+5:302022-07-16T07:07:41+5:30
विम्याच्या पैशाच्या नादात कुरिअर केला बॉम्ब, अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
मुंबई : संगणक आणि महागडा मोबाइल घेण्यासाठी जोगेश्वरीतील अल्पवयीन मुलाने बॉम्ब बनवत तो कुरिअर केला. इतकेच नव्हे तर तो टायमरने उडवून दिला. कुरिअरचे पार्सल खराब झाल्यास विम्याचे पैसे मिळतात हे त्याला समजल्याने अल्पवयीन मुलाने हा प्रकार केल्याचे तपासात उघड झाले.
मुलाने पोलिसांना सांगितले की त्याने हे उपकरण कसे बनवायचे हे शिकण्यासाठी यू-ट्यूब ट्यूटोरियल पाहिला. त्यानुसार १२ जुलै रोजी कुरिअर कंपनीत पार्सलचा स्फोट झाला. मात्र, कोणालाही मोठी दुखापत झाली नाही. कुरिअर फर्मने दुसऱ्या दिवशी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी गोदामाला भेट दिली तेव्हा जळलेल्या पार्सलमधील सामग्री पाहून ते थक्क झाले. कारण त्यात फटाके, एक सेलफोन आणि बॅटरीसह इलेक्ट्रिक सर्किटही होते. त्यानुसार जोगेश्वरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला. तपासकर्त्यांनी कुरिअर फर्मला पाठवणाऱ्याचा पत्ता विचारला. तेव्हा ते पाठवणारा सांताक्रूझ पूर्व येथील होता आणि तो अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. त्याने दोन महिन्यांपूर्वी विमा कंपनीची ऑनलाइन जाहिरात पाहिली होती. त्यात त्याला कळले की एखादी वस्तू पाठवताना खराब झाल्यास विमा कंपनी मालकाला त्याची मूळ किंमत आणि अतिरिक्त १०% भरपाई म्हणून द्यावी लागते. त्यातून त्याने हा प्रकार केला.
९ लाखांचे बिल
अल्पवयीनाने दोन संगणक प्रोसेसर, सेलफोन आणि मेमरी कार्ड खरेदी केले आणि ९ लाख ८० हजारांचे बनावट खरेदी बिलही तयार केले. त्याने चलन एका बॉक्समध्ये ठेवले ज्यामध्ये त्याने बॅटरी वापरून इलेक्ट्रिक सर्किट तयार केले आणि त्याच्या सोबत मोबाइल ठेवला होता. एकदा फोनवर अलार्म वाजला की, डिव्हाइसचा स्फोट होईल अशी सेटिंग करत त्याने पार्सलवर नवी दिल्लीतील बनावट पत्ता लिहिला होता.