गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी मागितली लाच; दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक!
By सुनील पाटील | Published: November 1, 2022 01:23 PM2022-11-01T13:23:29+5:302022-11-01T13:23:55+5:30
सावदा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान गायकवाड व सहायक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली.
जळगाव : मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्यात इतरांना आरोपी न करण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान गायकवाड व सहायक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. दोघांविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा मुलगा आकाश कुमावत याच्याविरुद्ध सावदा पोलीस स्टेशनला २५ जुलै रोजी अल्पवयीन मुलीला पळविणे व बलात्काराचा (गु.र.नं.०१३६/२०२२ भादवि कलम-३६३, ३७६ (२),(एन) पोस्को व कायदा कलम ४) गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांच्या मुलाला २७ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तक्रारदार हे आपल्या मुलास भेटण्यासाठी सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांना भेटले असता त्यांनी तुमचा मुलगा मुलीला घेऊन ज्यांच्या घरी थांबला होता, त्यात तुम्ही स्वतः, तुमची पत्नी, भाऊ व तुमची बहीण अशांना गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे ३० ऑगस्ट रोजी पंचासमक्ष ६० हजाराची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले होते.
ही रक्कम गायकवाड यांनी मिळविण्याचा प्रयत्न केला व इंगोले यांनी लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याने सिद्ध झाले. त्यानुसार मंगळवारी सकाळी आठ वाजताच दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सावदा येथून ताब्यात घेऊन जळगावात आणले. दुपारी दोघांविरुद्ध सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शशिकांत एस.पाटील, निरीक्षक संजोग बच्छाव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, बाळु मराठे, ईश्वर धनगर व राकेश दुसाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गुन्हे आढावा बैठकीआधीच कारवाई
जिल्हा पोलीस दलाची मंगळवारी सकाळी १० वाजता मंगलम सभागृहात गुन्हे आढावा बैठक होती. नूतन पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीसाठी जळगावाला येण्याच्या तयारीत असतानाच इंगोले व गायकवाड यांना एसीबीने ताब्यात घेतले. ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत त्याच पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. उपअधीक्षक शशिकांत पाटील तपास करीत आहेत.