आधी हात-पाय बांधले, नंतर विहिरीत दोरीने लटकवलं; १३ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 09:37 AM2023-12-18T09:37:29+5:302023-12-18T09:39:51+5:30
मुलाचा शोध घेत शेतात पोहोचताच संपूर्ण कुटुंब हादरलं. कारण शेतातील विहिरीत लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.
जयपूर : राजस्थानातील टोंक इथं एका अल्पवयीन मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. १३ वर्षीय तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मुलाचा मृतदेह खाली उतरवण्यात आला. तसंच पोलिसांकडून सदर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय अमरिश हा शनिवारी शाळा सुटल्यानंतर शेतात जातो, असं सांगून सायकलवर घराबाहेर पडला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी अमरिशचा शोध सुरू केला. मात्र शेतात पोहोचताच संपूर्ण कुटुंब हादरलं. कारण शेतातील विहिरीत लटकलेल्या अवस्थेत अमरिशचा मृतदेह आढळून आला. तसंच त्याचे हात-पायही बांधण्यात आले होते. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने त्याचा खून केल्याचं स्पष्ट झालं आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदवरच 'कांड'?; अज्ञातानं दिलं विष, हॉस्पिटलमध्ये असल्याची चर्चा
अल्पवयीन तरुणाच्या हत्येची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस कर्मचाऱ्यांनी अमरिशचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. वादातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र माझ्या मुलाचा कोणाशीही वाद नसल्याचं अमरिशच्या वडिलांनी म्हटलं आहे. शेतात त्याने एखादी अशी घटना पाहिली असेल ज्याबद्दल त्याने घरी येऊन सांगू नये, यासाठी त्याला संपवण्यात आलं असू शकतं, असा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, या घटनेबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक राजर्षी राज यांनी सांगितलं की, "या मुलाची हत्या झाल्याचं स्पष्ट आहे. याप्रकरणी आम्ही युद्धपातळीवर तपास करून आरोपींना लवकरात लवकर अटक करू."