रोटोमॅक कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल, ७५० कोटींचा कर्ज घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 10:50 AM2022-11-20T10:50:36+5:302022-11-20T10:51:44+5:30
या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, पेनांची निर्मिती करून देशभरात त्याचे वितरण करणाऱ्या रोटोमॅक या कंपनीने सन २०१२ साली इंडियन ओव्हरसीज बँकेच्या नेतृत्वाखालील सात बँकांकडून एकूण ५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले.
मुंबई : पेनाची निर्मिती करणाऱ्या रोटोमॅक कंपनीने इंडियन ओव्हरसीज बँकेच्या नेतृत्वाखाली सात बँकांनी दिलेल्या कर्जाच्या रकमेपैकी एकूण ७५० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी सीबीआयने कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी इंडियन ओव्हरसीज बँकेच्या लखनौ शाखेतील बँक मॅनेजरने सीबीआयकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, पेनांची निर्मिती करून देशभरात त्याचे वितरण करणाऱ्या रोटोमॅक या कंपनीने सन २०१२ साली इंडियन ओव्हरसीज बँकेच्या नेतृत्वाखालील सात बँकांकडून एकूण ५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले.
कंपनीला आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवहार करण्यासाठी या पैशांची आवश्यकता होती. मात्र, कंपनीने कर्जापोटी प्राप्त या पैशांचा वापर करत आंतरराष्ट्रीय पातळीवर किती व्यवहार केला, कुठे केला, याची कागदपत्रे कंपनी बँकेला सादर करू शकली नाही. बँकेने वारंवार सूचना करूनही ही कागदपत्रे न दिल्याने बँकेने या प्रकरणाचे फोरेन्सिक ऑडिट केले होते. यामध्ये कर्जापोटी प्राप्त झालेली रक्कम कंपनीने
अवैधरीतीने वापरल्याचे निष्पन्न झाले.
कंपनीच्या ताळेबंदात फेरफार
कंपनीच्या ताळेबंदातदेखील मोठ्या प्रमाणावर फेरफार केल्याचे दिसून आले. याचसोबत कंपनीने कर्जापोटी घेतलेल्या पैशांचीदेखील परतफेड थांबवली होती. यानंतर बँकेने सन २०१६ मध्ये हे कर्ज खाते थकीत असल्याचे घोषित केले. या प्रकरणाचा ईडीनेही यापूर्वीच तपास सुरू केला आहे.