वारसांना अंधारात ठेवून भूखंड हडपणाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 08:16 PM2023-05-20T20:16:48+5:302023-05-20T20:17:00+5:30
जेएनपीटी साडेबारा टक्के योजनेअंतर्गत गैरव्यवहाराचा प्रकार
उरण: आप्तस्वकीय असलेल्या वारसांना अंधारात ठेवून जेएनपीटी साडेबारा टक्के योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये किमतीचे भुखंड परस्पर हडप करु पाहाणाऱ्या काका, आत्या,पुतणी- पुतणे आणि त्यांना साथ देण्यासाठी खोटे दाखले देऊन मदत केल्या प्रकरणी तत्कालीन जसखार ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, उरण गटविकास अधिकारी व साडेबारा टक्के भूखंड योजनेच्या फाईल हाताळणारे तत्कालीन जेएनपीटी, सिडको अधिकारी यांच्या विरोधातच पुतण्याने पोलिसांत धाव घेतली आहे. पुतण्याच्या तक्रारींनंतर अखेर चाढकलपणा करणाऱ्या न्हावा-शेवा बंदर पोलिसांनी शासकीय अधिकाऱ्यांसह १० आरोपींवर गुन्हा दाखल केल्यानंतर उरण परिसरात खळबळ माजली आहे.
उरण तालुक्यातील जसखार येथील धनंजय आत्माराम ठाकूर यांची वडिलोपार्जित जमीन आहे.ही जमीन सिडकोने जेएनपीटी बंदर उभारण्यासाठी संपादन केली आहे.या संपादन करण्यात आलेल्या जमीनपोटी जेएनपीटी, सिडकोच्या साडेबारा योजनेअंतर्गत भुखंड देण्याची तयारी सुरू केली आहे.या जमिनीला कायद्याने सहा वारस आहेत. यापैकी धनंजय ठाकूर व इतर दोन वारसांचा मृत्यू झाला आहे.असे असतानाही विजय ठाकूर, मधुकर ठाकूर,विना पाटील, सुमती म्हात्रे, कुसुमावती पाटील आदी काका,आत्या,पुतणी- पुतणे आदींनी इतर वारसांना अंधारात ठेवून जमिनीची फाईल जेएनपीटी मार्फत सिडकोमध्ये जमा केली आहे. या फाईलमध्ये खोटी कागदपत्रे, मयत धनंजय आत्माराम ठाकूर यांच्या खोट्या सह्या, न्यायालयीन कागदपत्राचा खोट्या अर्थाने वापर करण्यात आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या फाईलमध्ये दोन मयत व्यक्तींना हयात दाखविलेले आहेत.
जसखार ग्रामपंचायतीने वास्तव्य करीत नसलेल्या सहा व्यक्तींच्या नावे जसखार गावचे कायमचे रहिवासी असल्याचे एकत्रित रहिवाशी दाखले जसखार ग्रामपंचायतीने दिले आहेत.या रहिवासी दाखल्यात दोन हयात नसलेल्या व्यक्तींची नावे आहेत. आप्तस्वकीयांनीच केलेल्या या गंभीर बाबींची पुतण्या शिरीष ठाकूर यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सिडको, जेएनपीटीकडे तक्रार केली.तसेच स्थानिक न्हावा-शेवा बंदर पोलिस ठाण्यापासून एसीपी, नवीमुंबई आयुक्तांकडेही लेखी तक्रारी दाखल केल्यानंतरही गुन्हा नोंदविण्यात पोलिस यंत्रणा दोन वर्षांपासून वर्षांपासून टाळाटाळ करीत होते. दोन वर्षांपासून विविध पोलिस ठाण्यांचे उंबरठे झिजविल्यानंतर गुरुवारी (१८ ) अखेर संबंधितांवर फसवणूक व इतर विविध कलमांखाली न्हावा-शेवा बंदर पोलिस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.यामध्ये तत्कालीन उरण गटविकास अधिकारी निलम गाडे, जसखार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दामोदर घरत, माजी उपसरपंच शैलेश ठाकूर, ग्रामसेवक राजेंद्र सातंगे आणि संबंधित विभागाचे जेएनपीटी, सिडको अधिकाऱ्यांही समावेश आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.