सतर्क महिला प्रवासी अन् मनसे आ. राजू पाटलांच्या प्रयत्नाने अल्पवयीन मुलीची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 09:08 AM2022-09-23T09:08:29+5:302022-09-23T09:10:16+5:30
अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन भीक मागणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल, सोशल मीडियावर व्हायरल फोटोमुळे प्रवासी संघटना, मनसे आमदार राजू पाटील यांची सतर्कता, मुलीला दिले चाईल्ड वेल्फेअर युनिटच्या ताब्यात
डोंबिवली- मुले पळवून नेणाऱ्या टोळीची अफवेमुळे पोलीस यंत्रणा हैराण असतानाच येथील रेल्वे स्टेशनवर मुंबई दिशेकडील रेल्वे ब्रिजवर एक महिला झोपलेल्या मुलीला घेऊन भीक मागत असल्याचा फोटो गुरुवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या मुलीला गुंगी असल्याने ती झोपलेली असून त्या महिलेची ती मुलगी नाही अशी शंका वाटली म्हणून एका जागरूक महिलेने तो फोटो समाज माध्यमांवर शेअर केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. त्यानुसार उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी त्याबाबत लोहमार्ग पोलीस, आरपीएफ, आणि मनसे आमदार राजू पाटील यांना त्याबाबत माहिती दिली. अल्पावधीतच संबंधित महिलेला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्या मुलीला चाईल्ड वेल्फेअफ युनिटच्या ताब्यात दिले.
पोलिसांची कारवाई रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास घडली. अरगडे यांना एका महिलेने समाज माध्यमांद्वारे त्या भीक मागणाऱ्या महिलेचा आणि गुंगीत असणाऱ्या मुलीचा फोटो टाकला. महिला आणि ती मुलगी यांच्यात साधर्म्य नसल्याने ती मुलगी नेमकी त्या महिलेकडे कशी आली. वेगळा काही प्रकार तर नाही ना याचे प्रसंगावधान राखून अरगडे यांनी रेल्वे पोलीस, मनसेचे आमदार पाटील यांना त्याबाबत माहिती दिली, पाटील यांनीही त्यानुसार लगेच कार्यकर्त्यांना सांगून घटनास्थळी जाण्यास सांगितले. तोपर्यंत अरगडे यांनी त्याबाबत तक्रार घेण्यास सांगितले, आणि काही वेळात पोलीस कर्मचारी पकडायला गेले तोपर्यंत ती महिला पळून गेली होती.
डोंबिवली स्टेशनवरील CSMT दिशेकडील रेल्वे ब्रिजवर ही भिकारी बाई एका झोपलेल्या मुलीला घेऊन भीक मागत होती. मला एका महिला प्रवासींनी हा फोटो शेअर केला आहे. कृपया लक्ष घालावे.@ThaneCityPolice@Dev_Fadnavis@DGPMaharashtra@RailMinIndiapic.twitter.com/xpLSkK4pRN
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) September 22, 2022
तात्काळ आजूबाजूच्या परिसरात त्यांनी शोध मोहीम सुरू केली आणि त्या भिकारी महिला व मुलीला ताब्यात घेतले, आता ते प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी आरपीएफने कडून जीआरपीकडे वर्ग केले असून त्या महिलेला घेऊन गेले आहेत, त्या भिकारी महिलेवर बाल भिक्षा गुन्हा दाखल करुन आरोपी केल्याचे सांगण्यात आले. ही मुलगी माझी नात आहे असे आरोपीने सांगितले असून त्यानूसार पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार त्या लहान मुलीला चाईल्ड वेल्फेअर युनिटच्या ताब्यात दिले आहे. पुढील अहवाल लवकरच प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले. ज्या महिलेने जागरुकता दाखवून फोटो काढून पाठवले त्या माया कोठावदे आणि मला फोटो पाठवून कळवले त्या सायली शिंदे या दोघींसह आमदार पाटील यांची मदत झाल्याचे अरगडे यांनी समाज माध्यमांवर त्या सगळ्यांचे आभार मानले. म्हंटले.