पोलीस अहवालाचा खोटा दाखला देत ‘फेक न्यूज’ प्रसारीत, अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल
By घनशाम नवाथे | Published: May 5, 2024 03:30 PM2024-05-05T15:30:59+5:302024-05-05T15:31:12+5:30
विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सांगली : पोलिसांचा जिल्हास्तरीय अहवालाचा खोटा दाखला देत रविकांत पिंगळे या नावाने ‘दीड लाखाच्या मताधिक्याने विशाल पाटील विजयी होणार’ अशी ‘फेक न्यूज’ सोशल मिडियावर ‘व्हायरल’ केल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी, सोशल मिडियावर शनिवारी ‘दीड लाखाच्या मताधिक्याने विशाल पाटील विजयी होणार, पोलिसांचा जिल्हास्तरीय अहवालात निष्पन्न’ असा मथळा असलेली ‘फेक न्यूज’ अज्ञाताने ‘व्हायरल’ केली होती. रविकांत पिंगळे या नावाने सदरची ‘फेक न्यूज’ सर्वत्र फिरत असल्याचे पाहून पोलिस दल सावध बनले. त्यांनी रविकांत पिंगळे या नावाचा शोध सुरू केला. परंतू तथाकथित नावाची कोणीही व्यक्ती जिल्ह्यातील वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी तसेच पोलिसांचा कोणताही अहवाल प्रसिद्ध झाला नसताना खोट्या अहवालाचा दाखल देत बातमी करून ती सोशल मिडियावरून प्रसिद्ध करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. अधीक्षक संदीप घुगे यांनी या ‘फेक न्यूज’ ची दखल घेत तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, पोलीस दलाने याबाबत दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक आचारसंहिता चालू असून गैरवाजवी प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने सोशल मिडियावरून कोणत्याही बातमीची खातरजमा न करता खोटी बातमी तयार करून ती प्रसारीत करू नये, पुढे पाठवू नये. सायबर पोलिस ठाण्याची सोशल मिडियावर करडी नजर आहे. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्याविरूद्ध आचारसंहिता भंग व इतर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.