शेअर मार्केटमधून जादा परताव्याच्या आमिषाने दोन कोटीचा गंडा, पाच जणांवर गुन्हा दाखल
By शीतल पाटील | Published: July 31, 2023 11:22 PM2023-07-31T23:22:45+5:302023-07-31T23:23:03+5:30
याप्रकरणी पुण्यातील पाच जणांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शीतल पाटील, सांगली
सांगली : शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक करून जादा परतावा देण्याच्या आमिषाने एकाची दोन कोटी ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील पाच जणांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र शिवाजी शिंदे (वय ३४, रा. कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
कुणाल शंतनू सावंत , अनिरूद्ध अनिल सावंत (दोघे, रा. किराडवाड, नानापेठ, पुणे), हर्षल अशोक साळुंखे, सेल्वी हर्षल साळुंखे, ललिता हर्षल साळुंखे (रा. लक्ष्मीनारायण मंदिर मंगळवार पेठ, पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी राजेंद्र शिंदे यांना संशयितांनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून पाच टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. तसेच गुंतविलेल्या रकमेच्या सुरक्षिततेसाठी जमीनही नावावर करण्याचे आश्वासन दिले. शिंदे व त्याच्या मित्राने संशयितांकडे काही रक्कम गुंतविली.
सुरूवातीला संशयितांनी फिर्यादीच्या मित्राला १२ लाखाचा परतावा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून २ कोटी ११ लाख ६० हजार रुपये घेतले. त्यानंतर संशयितांनी पाच टक्के परतावा व जमीनही नावावन न देता फसवणूक केली. या प्रकरणी शिंदे यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार अर्ज दिला. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी तक्रार अर्जाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत उपअधिक्षकांकडे अहवाल सादर केला होता. उपअधिक्षकांनी परवानगी देताच पाच संशयिताविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.