शालेय विद्यार्थ्याला मारणे भोवले, मुख्याध्यापिका व क्रीडा शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

By योगेश पांडे | Published: September 28, 2024 12:05 AM2024-09-28T00:05:40+5:302024-09-28T00:05:47+5:30

अमरावती मार्गावरील इन्फॅंट जिजस इंग्लिश मिडीयम स्कूल येथे हा प्रकार झाला.

A case has been registered against the headmistress and the sports teacher for allegedly killing a school student | शालेय विद्यार्थ्याला मारणे भोवले, मुख्याध्यापिका व क्रीडा शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

शालेय विद्यार्थ्याला मारणे भोवले, मुख्याध्यापिका व क्रीडा शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

नागपूर : खेळताना मित्राचा धक्का लागल्याने खाली पडून जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार करण्याऐवजी क्रीडा शिक्षकाने त्याला सर्वांसमोर छडीने मारल्याचा प्रकार समोर आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित विद्यार्थ्याला त्रास असल्याने वारंवार लघवीला जावे लागते. मात्र त्याचे शिक्षक त्याला लघुशंकेला जाण्यापासूनदेखील थांबवत होते. पालकांनी सांगूनदेखील याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्याध्यापिका व मारहाण करणाऱ्या क्रीडा शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

अमरावती मार्गावरील इन्फॅंट जिजस इंग्लिश मिडीयम स्कूल येथे हा प्रकार झाला. संबंधित १० वर्षीय विद्यार्थी या शाळेत शिकतो. त्याने अनेकदा त्याच्या आईला शाळेतील शिक्षक मारत असल्याचे सांगितले होते. मात्र त्याची काही चूक असेल म्हणून त्याच्या आईने दुर्लक्ष केले. त्यानंतर तो शाळेत जाण्यासाठी टाळाटाळ करायला लागला. त्याला लघवीचा त्रास असून दर अर्धा तासाने त्याला लघुशंकेला जावे लागते. त्याच्या आईने मुख्याध्यापिका रिना पीटर यांना या प्रकाराची कल्पना दिली होती. मात्र तरीदेखील शिक्षिका त्याला लघुशंकेला जाण्यापासून थांबवायच्या. यामुळे ऑगस्ट महिन्यात त्याच्या पोटात संसर्ग झाला व त्याला दवाखान्यात दाखल करावे लागले होते. त्यानंतर परत त्याच्या आईने मुख्याध्यापिका व वर्गशिक्षिकेला ही बाब सांगितली होती. परंतु तरीदेखील शिक्षिका त्याला लघुशंकेला जाऊ देत नव्हत्या. 

२४ सप्टेंबर रोजी खेळत असताना तो मुलगा मित्राचा धक्का लागून खाली पडला. त्यात त्याचे डोके, डोळा यांना जखम झाली. तो क्रीडा शिक्षक मॅक्वान यांच्याकडे गेला. मात्र शिक्षकाने त्याच्यावर प्रथमोपचार करण्याऐवजी तुझीच चुकी आहे असे म्हणत त्याला सगळ्यांसमोर काडीने मारले. त्याच्यावर कुठलेही उपचार न करता त्याला नंतर घरी पाठविण्यात आले. इतर मुलांकडूनदेखील शिक्षक वारंवार मारत असल्याच्या तक्रारी होत्या. अखेर मुलाच्या आईने वाडी पोलीस ठाणे गाठत तक्रार केली. पोलिसांनी मुख्याध्यापिका रिना पीटर व क्रीडा शिक्षक मॅक्वान यांच्याविरोधात अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: A case has been registered against the headmistress and the sports teacher for allegedly killing a school student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.