धारावी किल्ला येथे मद्यपान करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2022 11:09 PM2022-12-19T23:09:56+5:302022-12-19T23:10:09+5:30
नोटीस बजावल्यानंतर देखील येथे मद्यपान आदी अनैतिक प्रकार सुरूच असल्याने प्रशासनाच्या बेजबाबदारपणा बद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
मीरारोड- भाईंदरच्या धारावी किल्ला व पालिकेने बांधलेल्या नरवीर चिमाजी अप्पा स्मारकाच्या आवारात मद्यपान करणाऱ्या दोघा जणांवर गडप्रेमींच्या तक्रारीनंतर उत्तन सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भाईंदर पश्चिमेच्या चौक डोंगरावर समुद्रा लगत धारावी किल्ला आहे. पालिकेने नरवीर चिमाजी अप्पा यांचा पुतळा उभारला आहे . ऐतिहासिक किल्ला असलेल्या ह्या परिसरात सर्रास मद्यपान, धूम्रपान सह अमली पदार्थांची नशा व अनैतिक प्रकार चालत असल्याने गडप्रेमीं कडून सातत्याने संताप व्यक्त होत आहे . किल्ल्याचे पावित्र्य असल्या अनैतिक प्रकारांनी नष्ट होत असल्याने कारवाईची मागणी होत असतानाच राज्य मानवी हक्क आयोगाने देखील ह्या प्रकारांची गंभीर दखल घेत पोलीस, पालिका, जिल्हाप्रशासन व शासनास नोटीस बजावल्या आहेत.
नोटीस बजावल्यानंतर देखील येथे मद्यपान आदी अनैतिक प्रकार सुरूच असल्याने प्रशासनाच्या बेजबाबदारपणा बद्दल नाराजी व्यक्त होत आहे. रविवारी रात्री गडप्रेमींनी परिसरात जाऊन पाहणी केली असताना पालिकेच्या चिमाजी आप्पा स्मारक उद्यानच्या आत मद्यपान चालू होते. प्रवेशद्वार बंद तर रखवालदार असताना सुद्धा आत मध्ये जाऊन मद्यपान केले जात होते.
गडप्रेमींनी याची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले व स्मारकाच्या परिसरात मद्यपान करत बसलेल्या प्रशांत मढवी ( २८) रा. चौक गाव ह्याला पकडले . तर चौक जेट्टी जवळ पोलिसांना साबियो मुंबईकर ( २५) रा . चौक गाव हा दारू पिताना आढळून आल्याने त्याला सुद्धा ताब्यात घेतले . दोघांवर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.