चित्रपट निर्मातीच्या घरात मोलकरणीचा डल्ला, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 07:40 AM2023-03-21T07:40:33+5:302023-03-21T08:04:23+5:30
१६ मार्च रोजी शबिना हॉटेल ताजमध्ये एका लग्न सोहळ्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी दोन कर्णफुले आणि तीन हिऱ्याचे ब्रेसलेट परिधान केले होते.
मुंबई : हिंदी चित्रपट निर्मात्या शबिना खान (५५) यांच्या घरात मोलकरणीने डल्ला मारल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाली हिल परिसरात राहणाऱ्या खान यांनी चार महिन्यांपूर्वी अफसाना शेख (२२) नामक मुलीला घर कामासाठी ठेवले होते तर काजल (३५) ही महिला स्वयंपाक तर नौशाद ही साफसफाईचे काम करते. १६ मार्च रोजी शबिना हॉटेल ताजमध्ये एका लग्न सोहळ्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी दोन कर्णफुले आणि तीन हिऱ्याचे ब्रेसलेट परिधान केले होते.
घरी परतल्यावर त्यांनी दागिने बेडरूममधील टेबलवर ठेवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अफसाना हिला त्यांनी आवाज दिला. त्यावर काजलने ती सकाळी ६ वाजता कुठेतरी निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर खान यांनी दागिने तपासले तेव्हा ते तिथे नव्हते. ज्याची किंमत १ लाख ७५ हजार रूपये आहे. त्यानुसार अफसाना हिनेच दागिने पळवून नेल्याचा संशय खान यांनी व्यक्त करत तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अफसानाविरोधात गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.