बोरगाव पोलिसांना धक्काबुक्की व शासकीय कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 05:25 PM2022-10-05T17:25:08+5:302022-10-05T17:26:09+5:30
उंब्रज - हरपळवाडी ता. कराड येथील एका गुन्ह्यातील संशयित आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या बोरगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी, पोलीस कर्मचारी व ...
उंब्रज - हरपळवाडी ता. कराड येथील एका गुन्ह्यातील संशयित आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या बोरगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी, पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या २ जवानांवर जमावाने हल्ला करून धक्काबुक्की केली.शासकीय कामात अडथळा निर्माण केला.याप्रकरणी उंब्रज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार उत्तम साधू गायकवाड यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ०४ ऑक्टोबर रोजी बोरगांव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींना पकडणेसाठी बोरगाव पोलिसांनी दोन टिम केल्या.
टीम हरपळवाडी ता. कराड गांवात वेगवेगळया दोन ठिकाणी जाऊनआरोपींचा शोध घेत होत्या. यावेळी संशयित आरोपी शहाजी काळभोर याच्या घरासमोर रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक सुनिल ढाणे व त्यांचे पथकातील एक पोलीस अंमलदार व दोन गृहरक्षक गेले. त्यांनी शहाजी काळभोर च्या घराचे दरवाजा वाजवून, शहाजी काळभोर घरात आहेत काय? अशी विचारणा केली तसेच पोलिसांनी आम्ही पोलीस आहोत असे सांगितले.
शहाजी काळभोर याने पोलीस आहेत तर तुमचे आयकार्ड दाखवा असे म्हणत गावातील त्याचे इतर मित्रांना फोन करुन १६ ते १७ लोकांना घरासमोर बोलावून घेतले. पोलीस उपनिरीक्षक सुनिल ढाणे पोलीस कर्मचारी उत्तम गायकवाड व दोन्ही गृहरक्षक यांना धक्काबुक्की करुन पोलिसांचे शासकीय कामात अडथळा केला.या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात शहाजी खंडेराव काळभोर, अमोल बाळासो पवार, योगेश बाळु सपकाळ, उद्धव शिवाजी काळभोर व इतर १० ते १२ सर्व रा. हरपळवाडी ता. कराड यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत.