खोटे शपथपत्र व खोटी माहिती देऊन बांधकाम परवानगी मिळवत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल
By धीरज परब | Published: October 12, 2022 06:15 PM2022-10-12T18:15:29+5:302022-10-12T18:15:52+5:30
Crime News: युएलसी साठी शेतकऱ्यांच्या नावे परस्पर अर्ज देऊन फसवणूक केल्या प्रकरणी मीरारोड पोलिसांनी अखेर स्वास्तिक कंस्ट्रक्शनचे मालक आणि ७११ कंस्ट्रक्शन च्या संजय सखाराम सुर्वे वर गुन्हा दाखल केला आहे .
मीरारोड - भाईंदरच्या गोडदेव गावातील स्थानिक आगरी भूमिपुत्रांचा जमीन मालकीचा हक्क असताना परस्पर खोटे शपथपत्र व खोटी माहिती देऊन तसेच युएलसी साठी शेतकऱ्यांच्या नावे परस्पर अर्ज देऊन फसवणूक केल्या प्रकरणी मीरारोड पोलिसांनी अखेर स्वास्तिक कंस्ट्रक्शनचे मालक आणि ७११ कंस्ट्रक्शन च्या संजय सखाराम सुर्वे वर गुन्हा दाखल केला आहे .
फिर्यादी विकास हरेश्वर पाटील हे गोडदेव गावचे स्थानिक असून वडिलोपार्जित सामायिक कुटुंबाच्या जमिनी आहेत . विकास यांच्या काही नातलगांच्या हिश्याची जमीन स्वस्तिक कंस्ट्रक्शनचे मालक संजय सुर्वे व किसनलाल पुरोहित यांनी अधिकारपत्र द्वारे घेतली . सुर्वे यांनी तीच जमीन सेव्हन इलेव्हन कंस्ट्रक्शनचे संचालक राकेश जैन याना हस्तांतरित केली .
विकास सह त्यांचे आजोबा , वडील व भावंडानी त्यांच्या हिश्याची जमीन दिली नसताना देखील सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन चे संचालक म्हणून सुर्वे याने नवघर सर्वे २८८ पैकीची सर्व जमीन त्यांची नसताना तसेच न्यायालयात दावा सुरु असताना सुद्धा खोटे शपथपत्र महापालिकेला सादर करून बांधकाम परवानगी मिळवली . अकृषिक जमीन नसताना परवानगी पालिकेने दिली . युएलसी नाहरकत दाखला मिळवण्यासाठी विकास यांच्या आजोबा व त्यांच्या भावाच्या नावे जिल्हाधिकारी यांना परस्पर अर्ज केले .
या बाबत विकास यांनी सातत्याने महापालिका , पोलीस आदींना तक्रारी करून गुन्हा दाखल करण्यासह बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी चालवली होती . मीरारोड पोलिसांनी अखेर १० ऑक्टोबर रोजी या प्रकरणी सुर्वे वर गुन्हा दाखल केला आहे . तर कंपनीचे लाभार्थी मालक , संबंधित पालिका अधिकारी आदींना सुद्धा आरोपी करण्याची मागणी विकास यांनी केली आहे .