आमदार गणपत गायकवाड यांच्यासह ८ जणांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Published: February 4, 2024 04:28 PM2024-02-04T16:28:47+5:302024-02-04T16:29:00+5:30
मदार गायकवाडसह दोघांना अटक झाली असून त्याच रात्री साडे नऊ वाजता वादग्रस्त जमीन मालकाच्या तक्रारीवरून आमदार गायकवाड यांच्यासह आठ जणांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यावर साथीदारावर गोळीबार केल्या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदिप सरवनकर यांच्यासह ७ पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी आमदार गायकवाडसह दोघांना अटक झाली असून त्याच रात्री साडे नऊ वाजता वादग्रस्त जमीन मालकाच्या तक्रारीवरून आमदार गायकवाड यांच्यासह आठ जणांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्वारलीगावात ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जमिनीच्या वादातून एकनाथ जाधव कुटुंबियाला भाजप आमदार गायकवाड यांच्यासह समर्थकांनी जातीवाचक शिवीगाळ केली. अशी तक्रार मधुमती उर्फ नीता एकनाथ जाधव यांनी २ जानेवारीला रात्री साडे नऊ वाजता केल्यावर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारेख, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल व मंगेश वारघेर या आठ जणां विरोधात अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला. यानंतर अवघा दिड तासात गोळीबाराची घटना पोलीस ठाण्यात घडली असून या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहे.
आमदार गणपत गायकवाड यांच्यासह सहकाऱ्याविरोधात अट्रोसिटी व गोळीबाराचा गुन्हा दाखल झाला. त्यापूर्वी ३१ जानेवारीला दुपारी दीड वाजता व २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता द्वारलीगावच्या वादग्रस्त जागेत प्रवेश करून जागेवरील कंपाऊंडचे पोल फेकून दिले. याप्रकरणी मे. फेअरडील डेव्हलपर्सचे भागीदार जितेंद्र पारीक यांच्या तक्रारीवरून २ फेब्रुवारी दुपारी शिवसेना कल्याण पूर्वेचे शहरप्रमुख महेश गायकवाड, अक्षय दिनेश गायकवाड, राहुल पाटील, किरण फुलोरे, एकनाथ जाधव, सुनील जाधव यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या वादातून आमदार गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख गहेश गायकवाड पोलिस ठाण्यात गेले होते. वादग्रस्त जागेवरून पोलिस ठाण्यात चर्चा सुरु असतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप हे केबिन बाहेर जाताच वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या केबीनमध्ये आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यासह त्याचे साथीदार राहूल पाटील याच्यावर गोळीबर केल्याची घटना घडली आहे.