शिंदे गटातील पदाधिकाऱ्यावर बलात्कारासह महिलेला जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 06:29 AM2022-09-12T06:29:52+5:302022-09-12T06:30:27+5:30
आरोपी ज्योतीराम धोंगडे पालिकेच्या टँकरने पीडितेच्या घरी पाणीपुरवठा करीत होता. त्यातून दोघांची ओळख झाली.
औरंगाबाद : शिंदे गटात प्रवेश केलेला युवासेनेचा तत्कालीन पूर्व शहर अधिकारी ज्योतीराम विठ्ठलराव धोंगडे (रा. मातोश्रीनगर, गारखेडा) यांच्यावर बलात्कारासह गर्भपात, जिवे मारण्याचा प्रयत्न, बंदुकीचा धाक दाखवून दीड ते दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला.
महिलेच्या फिर्यादीनुसार, आरोपी ज्योतीराम धोंगडे पालिकेच्या टँकरने पीडितेच्या घरी पाणीपुरवठा करीत होता. त्यातून दोघांची ओळख झाली. त्याच कालावधीत पीडितेचे पतीसोबत वाद सुरू झाले. त्याचा गैरफायदा घेत आरोपीने धीर देत तिला जाळ्यात ओढले. दौलताबाद परिसरातील हिरण्य रिसॉर्ट येथे फिरायला नेले. तेथे शारीरिक संबंध निर्माण झाले. त्यावेळी आरोपीने आक्षेपार्ह चित्रफीत काढली. नंतर ती व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने सुरुवातीला तीन लाख, मोबाइलसह ३५ लाखांचे दागिने घेतले. त्यानंतरही अत्याचार केले. या संबंधातून तिला मुलगी झाली. तिच्या पतीला संबंधांची माहिती झाल्यावर त्याने घटस्फोट दिला. पहिली मुलगी झाल्यानंतर पीडिता आरोपीपासून दोन वेळा गरोदर राहिली. तेव्हा आरोपीने गर्भपात केला. २ मार्चला तीन महिन्यांची गरोदर असताना आरोपीने पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे गर्भाचा पोटातच मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.